scorecardresearch

हार्दिक पटेल यांची भाजपवर स्तुतिसुमने!

पाटीदार समाजाचे नेते आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी भारतीय जनता पक्षावर स्तुतिसुमने उधळली आहेत.

अहमदाबाद : पाटीदार समाजाचे नेते आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी भारतीय जनता पक्षावर स्तुतिसुमने उधळली आहेत. आपल्यापुढील सर्व पर्याय खुले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.  ‘इंडियन एक्स्प्रेस’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पटेल यांनी निर्णयप्रक्रियेत काँग्रेसचे नेतृत्व आपल्याला सहभागी करून घेत नसल्याची टीका केली होती.

येथील स्थानिक वृत्तपत्राला शुक्रवारी दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पटेल यांनी भाजपच्या नेतृत्वाच्या   निर्णयक्षमतेची स्तुती केली. ते म्हणाले, की जम्मू-काश्मीरसाठीचा अनुच्छेद ३७०  हटवणे, अयोध्येत राममंदिर उभारणे आदी भाजपच्या निर्णयांचा एक हिंदु म्हणून आपल्याला अभिमान वाटतो. भाजपकडे धाडसी निर्णयक्षमता असणारे नेतृत्व आहे. मी काँग्रेसवर नाराज आहे म्हणून असे म्हणत नाही. मात्र, भाजप आपल्या संघटना बांधणीवर भरपूर काम करतो. विविध व्यक्तींवरील जबाबदाऱ्यांमध्ये नियमित बदल करतो. आपल्या फोनची प्रणाली जशी अद्ययावत होत असते, त्याप्रमाणेच भाजप काळानुरूप बदल करत असतो.  भाजपमध्ये प्रवेश करणार का, असे विचारले असता, पटेल यांनी सांगितले, की  गुजरातच्या विकासासाठी मी बांधील असून, त्यानुसार माझी वाटचाल असेल. माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. गुजरातला २०१५ मध्ये पाटीदार समाज आंदोलनात हिंसाचार झाला होता, त्यासंदर्भातील पटेल यांच्यावरील खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवल्याने विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे पटेल यांनी जाहीर केले आहे.

काँग्रेसमध्येच राहण्याचा पुनरुच्चार

पटेल यांच्या या मुलाखतीनंतर आपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाळ इटालिया यांनी त्यांना आप पक्षप्रवेशासाठी जाहीर निमंत्रण दिले. मात्र, आपण कॉंग्रेस सोडणार नसल्याचा पुनरुच्चार पटेल यांनी केला. आपण प्रदेश नेतृत्वाबाबतचे आपल्या मतभेदांबद्दल आपण काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळवल्याचेही त्यांनी सांगितले. 

 ‘काँग्रेसच्या अनेक नेत्यांची हीच भावना’

हार्दिक पटेल यांच्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की भाजपच्या विचारधारेने अवघा देश प्रभावित झाला आहे. पक्षाचे अतुलनीय नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेहनतीतून देशाची २०१४ पासून विकासाच्या मार्गावर घोडदौड सुरू आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव काँग्रेसच्या नेतृत्वावर पडणे स्वाभाविक आहे. हार्दिक पटेलच नव्हे तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांचीही हीच भावना आहे. फक्त पटेल यांनी हे उघडपणे व्यक्त केले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hardik patel praises bjp patidar community leaders bharatiya janata party ysh

ताज्या बातम्या