Lord Indra Complaint Hardoi Marathi News: पाऊस पडला नाही किंवा गरजेपेक्षा जास्त कोसळला तर काही लोक थेट देवाला जबाबदार धरतात. पाऊस कमी-जास्त होण्यामागे वैज्ञानिक कारण असले तरी अनेकांची वेगवेगळी श्रद्धा असू शकते. उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील एक इसमाने मुसळधार पावसामुळे हैराण झाल्यानंतर थेट इंद्र देवाची तक्रार केली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वैतागलेल्या या इसमाने म्हटले की, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आमचे दैनंदिन जीवनमान विस्कळीत झाले आहे.
इंडिया टुडेने या संदर्भात बातमी दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या जनसुनवाई समाधान पोर्टलवरून सामान्यांना ऑनलाइन तक्रार दाखल करता येते. २६ वर्षीय सूरज तिवारी यांनी यावरून आपली तक्रार दाखल केली.
तिवारी यांनी तक्रारीत म्हटले, “कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे आमचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. हरदोई येथे इंद्र देवाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता सारखा पाऊस पाडला जात आहे. यामुळे सामान्य माणूस अडचणीत सापडला आहे.” रस्ते, गल्ल्या आणि सखल भागात पाणी साचले आहे. तसेच शेतकऱ्यांसमोरही पीक वाचविण्याचे संकट उभे राहिले आहे. इंद्र देवाच्या या कृतीमुळे आता सामान्य माणसाला घरातून बाहेर पडणेही अवघड झाले आहे. तसेच दैनंदिन काम सुरळीत करणे अवघड झाले आहे, असेही तक्रारीत पुढे म्हटले गेले.
पण या तक्रारीतील सर्वात लक्ष्यवेधी भाग शेवटी लिहिला होता. ज्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे अजब मागणी करण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी इंद्र देवाशी संपर्क साधावा
तक्रारदार तिवारी यांनी पुढे म्हटले, “माझ्याकडे इंद्र देवाचा नंबर नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की, आपल्या दिव्य शक्तीच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क साधावा आणि इंद्र देवाला योग्य ते निर्देश द्यावेत. हे प्रकरण आपण गांभीर्याने घ्यावे आणि इंद्र देवाला पावसावर नियंत्रण आणण्यास सांगून सामान्यांना दिलासा द्यावा.”
तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींच्या मते तिवारी यांनी उपरोधाचा वापर करून यंत्रणेलाच जाब विचारला आहे. उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे जीवितहानी आणि इतर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
हरदोई जिल्ह्यात २५ ते २७ सप्टेंबर या दोन दिवसांत पावसामुळे सात लोकांचा मृत्यू झाला. तर आणखी सात जण गंभीर जखमी झाले. पावसामुळे बाहेर आलेल्या सापांचाही धोका वाढला असून काही ठिकाणी सर्पदंशाच्या घटना घडल्या. ३० जनावरे दगावली असून ३३० घरे कोसळल्याचीही माहिती समोर आली आहे.
