Rajasthan Governor Haribhau Bagade in ICU: राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना मंगळवारी जयपूरमधील सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेलेल्या राज्यपालांना अचानक अस्वस्थता जाणवली आणि त्यानंतर त्यांना ताप आल्याने डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.

एसएमएस रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांच्या उपचारांसाठी आणि त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी नऊ सदस्यांची डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक वैद्यकीय उपचार देत आहे. सध्या त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून पुढील तपासण्या सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

हरिभाऊ बागडे हे सध्या राजस्थानचे ४५ वे राज्यपाल असून जुलै २०२४ पासून ते या पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २७ जुलै २०२४ रोजी केली होती.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चितेपिंपळगाव येथे त्यांचा जन्म झाला. ते दीर्घकाळ राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) कार्यकर्ते राहिले असून मराठवाडा प्रदेशात भारतीय जनता पार्टी (भाजप) मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. तसेच ते महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणूनही कार्यरत होते. ग्रामीण भागातील भाजपचा महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.

राजकीय वर्तुळात ‘नाना’ या नावाने ओळखले जाणारे हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती डॉक्टरांच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.