हरिद्वार मधील हर की पौरी मध्ये गैर-हिंदूंना प्रवेश बंदी असल्याचे फलक झळकले आहेत. हर की पौरीचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या गंगा सभेकडून प्रत्येक घाटाच्या प्रवेशद्वारावर तसेच खांब व रेलिंग्सवर ‘अहिन्दू प्रवेश निषेध क्षेत्र’ असे फलक लावण्यात आले आहेत. हरिद्वार मधील कुंभ परिसराला हिंदू क्षेत्र घोषित करण्याची मागणी उत्तराखंडमध्ये केली जात आहे. काही दिवसांपूर्वी हर की पौरी मधील दोन तरूणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गंगा सभेने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे.

हर की पौरी मधील मुख्य घाटावर गैर-हिंदूंना याआधीच प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. हरिद्वार महानगरपालिका कायदा १९१६, नुसार मुख्य घाटावर स्नान केले जाते त्या ठिकाणी गैर-हिंदूंना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तशी तरतूद कायद्यात आहे.

अरबी वेषभूषा असलेल्या तरूणांचा व्हिडीओ व्हायरल

तीन दिवसांपूर्वी हर की पौरी भागातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात कंदुरा (अरबी वेषभूषा) पोशाखात दोन तरूण हर की पौरी भागात फिरत असल्याचे दिसून आले होते. दरम्यान, ते दोन तरूण हिंदूच असल्याचे नंतर उघडकीस आले. युट्यूब चॅनेलसाठी ते दोघे व्हिडीओ बनवत होते. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गैर-हिंदूंना प्रवेश बंदी असल्याचे फलक हर की पौरीमध्ये लावण्यात आले.

गंगा घाटांवर गैर-हिंदूंना प्रवेश बंदी घालण्याची मागणी

हरिद्वार मध्ये पुढील वर्षी अर्ध कुंभ पार पडणार आहे. त्याआधी कुंभ क्षेत्रातील सर्व मंदिरांमध्ये व गंगा घाटांवर गैर-हिंदूंना प्रवेश बंदी घालण्यात यावी अशी मागणी गंगा सभेने उत्तराखंड सरकारला केली आहे. उत्तराखंड सरकार त्यावर गांभीर्याने विचार करत आहे. कंदुरा घटनेनंतर गंगा सभेने हरी की पौरी मध्ये गैर-हिंदूंना प्रवेश बंदी घातली आहे. तसेच सरकारी विभाग, इतर संस्था व माध्यमांना फक्त हिंदू कर्मचाऱ्यांनाच हरी की पौरी परिसरात पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे धार्मिक स्थळाचे पावित्र्य राखले जाईल, असे गंगा सभेने म्हटले आहे.

हरिद्वारचे मनपा आयुक्त काय म्हणाले ?

गंगा सभेचे नितीन गौतम यांनी ‘पीटीआय’ला याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हरिद्वार महानगरपालिका कायदा १९१६ नुसार गैर-हिंदूंना हर की पौरीमध्ये प्रवेश बंदी आहे. याच कायद्याची माहिती देण्यासाठी हर की पौरीमध्ये फलक लावण्यात आले आहेत.” धार्मिक स्थळाची पवित्रता अबाधित राहावी तसेच कोणत्याही प्रकारचा वाद विवाद होऊ नये म्हणून फलक लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हरिद्वारचे महापालिका आयुक्त नंदन कुमार यांनी १९१६ च्या नियमांनुसार गैर-हिंदूंना हर की पौरी भागात प्रवेश बंदी असल्याचे सांगितले.