उत्तराखंडातील हरिद्वारमध्ये दुसऱ्या धर्मातील मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या मुस्लिम तरुणाला १० ते १२ जणांच्या जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमावाने तरुणाच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
घरात घुसून मारहाण
एफआयआरनुसार तक्रारदार महिला आणि तिचा मित्र हे एकमेकांना ५ वर्षांपासून ओळखतात. शनिवारी ते दोघे तिच्या घरी असताना १० ते १२ अज्ञात व्यक्ती तिच्या घरात घुसले आणि त्यांनी तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
महिलेने सांगितले की, “मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकले नाही. त्यांनी शिवीगाळ केली, माझ्या मित्राला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले.” मूळची लखनऊची असलेली ही महिला गेल्या १० वर्षांपासून हरिद्वारमध्ये राहत आहे.
गळ्यात कुत्र्याचा पट्टा
घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये मारहाण केलेल्या तरुणाला घरासमोर बसवून त्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधलेला दिसत आहे. त्यावेळी संशयित त्याची चौकशी करत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
महिलेच्या बहिणीने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा हरियाणातील कर्नालचा रहिवासी आहे. तो हरिद्वारमध्ये काम करत होता व घरी येत असे. ती म्हणाली, “शनिवारी काही जणांनी दरवाजा ठोठावला. माझ्या बहिणीने दार उघडताच ते घरात घुसले आणि त्याला मारहाण सुरु केली. त्याला रक्त येत असतानाही त्यांनी मारहाण थांबवली नाही. त्यांनी माझ्या बहिणीला शिवीगाळ केली आणि त्याला घराच्या बाहेर नेऊन गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधला. एखाद्याच्या घरी घुसून ते अशी मारहाण कशी करू शकतात.”
अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत दुखापत करणे, दंगल घडवणे, घरात बेकायदेशीर प्रवेश करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि शांतताभंग होईल या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे.
तक्रारदार महिलेने सांगितले की, “जर त्याचा जीव गेला असता, तर त्याला कोण जबाबदार असते? त्याला एखाद्या कुत्र्यासारखी मारहाण करण्यात आली,” असेही त्या म्हणाल्या. जमावाने त्याचा फोन आणि इतर वस्तू हिसकावून घेतल्याचा दावाही त्यांनी केला.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. शहर विभागाचे सर्कल ऑफिसर शिशुपाल सिंह नेगी यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. “आरोपींची ओळख पटवून पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही फुटेज गोळा करत आहोत,” असे ते म्हणाले.
