थंडीपासून बचाव व्हावा म्हणून लोक रजई पांघरतात, स्वेटर घालतात, उबदार कपड्यांचा वापर करतात. गरमागरम चहा पिऊन तरतरी आणण्याचा प्रयत्न करतात. तरीही थंडी गेली नाही तर शेकोटी पेटवतात. पण थंडीमुळे कोणाला अटक झाल्याचे ऐकले तर? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हरिद्वार पोलिसांनी हे चक्क करून दाखवले आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आहे. हाडे गोठवणारी थंडी सध्या उत्तर भारतात आहे. याच कडाक्याच्या थंडीपासून भिकाऱ्यांचा बचाव व्हावा म्हणून त्यांना हरिद्वार पोलिसांनी अटक केली. हरिद्वारचे जिल्हादंडाधिकारी यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना या संदर्भातला आदेश दिला ज्यानंतर फूटपाथवर झोपलेल्या, रस्त्यावर राहणाऱ्या भिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच कडाक्याच्या थंडीमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर, फूटपाथवर राहणाऱ्या भिकाऱ्यांना अटक करून शेल्टर होममध्ये धाडण्याची कारवाई सुरु केली आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. हरिद्वार जिल्हा प्रशासनाने या संदर्भातला निर्णय घेतला. या सगळ्या कारवाई दरम्यान पहिल्यांदाच महिला भिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करण्याची वेळ अनेक लोकांवर परिस्थितीमुळे येते. मात्र असे भिकारी थंडीच्या कारणामुळे मृत्यूमुखी पडू नयेत म्हणून पोलिसांनी ही काळजी घेतली आहे. जास्तीत जास्त भिकाऱ्यांना शेल्टर होमचा आसरा मिळावा यासाठी पोलिसांनी ही कारवाई सुरु केली आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीत भिकाऱ्यांचा नाहक बळी जाऊ नये हेच या कारवाईमागचे मुख्य कारण आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तापमानाचा पारा येत्या काही दिवसांमध्ये आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या थंडीमुळे रस्त्यावर आसरा घेणाऱ्या भिकाऱ्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून त्यांना अटक करून शेल्टर होममध्ये पाठवण्यात येते आहे.