Harish Rana : हरीश राणाची इच्छामृत्यूची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. हरीश राणाच्या आई वडिलांनी त्याला इच्छामरण दिलं जावं ही मागणी न्यायालयाकडे केली होती. प्रदीर्घ कालावधीनंतर ही संमती देण्यात आली आहे. हरीश राणाला पॅसिव्ह यूथिनिसिया दिला जातो आहे. लाइफ सपोर्ट सिस्टिम काढण्यात येईल आणि मग त्याचा इच्छामृत्यू होईल. आरएमएल रुग्णालयायाचे भूलतज्ज्ञ डॉ. संदीप मिश्रा यांनी ही प्रक्रिया समजावून सांगितली.
पॅसिव्ह युथिनिसिया म्हणजे काय?
पॅसिव्ह युथिनिसियाचा अर्थ रुग्णाच्या कुटुंबाने रुग्णासाठी इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली आहे. गाझियाबादच्या राणा दाम्पत्याने तीन वर्षे कायदेशीर लढाईनंतर मुलासाठी इच्छामरणाची याचिका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मंजूर केली आहे. पॅसिव्ह युथिनिसियाची प्रोसेस कशी असते याची माहिती डॉ. संदीप मिश्रा यांनी दिली. दोन मेडिकल बोर्ड स्थापन केले जातात. ते त्यांचा अहवाल कोर्टाला देतात. यातलं पहिलं बोर्ड रुग्णाची वैद्यकीय अवस्था काय आहे त्याचा अहवाल देतं. दुसरं बोर्ड रुग्णाची अवस्था काय आहे ते स्वतः पाहतात आणि पहिल्या बोर्डाने दिलेला अहवाल योग्य आहे ना ते तपासून पाहतात. पॅसिव्ह यूथिनिसाया देताना रुग्णाला वेदना होऊ नये म्हणून पूर्णपणे काळजी घेतली जाते.
कशी असते इच्छामरणाची प्रक्रिया?
१) टप्प्याटप्प्यात रुग्णाला देण्यात येणारी लाइफ सपोर्ट सिस्टिम काढली जाते.
२) रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तर ते आधी हटवलं जातं, त्यानंतर औषधं कमी केली जातात. त्यानंतर त्याला देण्यात येणारं अन्न कमी केलं जातं.
३) मेडिकल बोर्डाने जी नियमावली दिली आहे त्यानुसारच ही प्रक्रिया चालते.
४) रुग्णाच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाते. रुग्णाचे कपडे बदलणे, त्याला स्पंजिंग करणं याची हेदेखील केलं जातं.
५) रुग्णाला पॅलेटिव्ह केअर युनिटमध्ये शिफ्ट केलं जातं. तिथे त्याला कुठल्याही वेदना होत नाहीत. वेदना रहीत मृत्यू व्हावा यासाठी रुग्णालय पूर्ण काळजी घेतं.
६) या दरम्यान जी औषधं दिली जातात ती आयुष्य वाढवणारी नाही तर वेदनारहीत मृत्यूकडे नेणारी असतात. रुग्णाच्या कुटुंबाला त्याची पूर्ण कल्पना दिली जाते.
इच्छामरणाचं भारतातलं पहिलंच प्रकरण
हरीश राणाला इच्छामरण मान्य करण्यात आलं आहे. भारतातलं हे पहिलंच प्रकरण आहे. प्रत्येक प्रकरणानुसार आणि रुग्णाच्या स्थितीनुसार इच्छामरणाची प्रक्रिया काही प्रमाणात वेगवेगळी असू शकते. जो रुग्ण अनेक वर्षांपासून कोमात आहे, त्याला काही संवेदना नाहीत अशा रुग्णाला होणाऱ्या वेदना त्या रुग्णाला समजतात का? हे विचारलं असता डॉ. मिश्रा यांनी सांगितलं की ज्यांच्या संवेदना गेलेल्या असतात अशाच रुग्णांसाठी इच्छामरण मागितलं जातं. दरम्यान रक्तदाब वाढणं किंवा हृदयाची धडधड वाढणं यावरुन हे समजता येतं की अशा रुग्णालाही वेदना होत आहेत. अशावेळी वेदना शमवणारी औषधं दिली जातात. इच्छामरणाच्या पूर्ण प्रक्रियेला दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो असंही मिश्रा यांनी सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
