हरीश राणा या तरुणाची इच्छामरणाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. भारतात इच्छामरणाची मागणी मान्य झालेला हरीश राणा हा पहिला तरुण आहे. १३ वर्षांपासून जिवंतपणी मरण यातना सहन करणाऱ्या हरीशला गाजियाबाद येथील एम्स या ठिकाणी आणण्यात आलं आहे. या ठिकाणी त्याला लावण्यात आलेली लाइफ सपोर्ट सिस्टिम हटवली जाईल. या दरम्यान हरीशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ब्रह्मकुमारीच्या एक दीदी हरीशच्या कपाळावर टिळा लावत आहेत. त्या दरम्यान त्या म्हणाल्या आहेत ‘सबको माफ करते हुए और सबसे माफी मांगते हुए अब जाओ.. ठीक है…’ हरीश राणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर समोर आला २२ सेकंदांचा व्हिडीओ
सोशल मीडियावर हरीश राणाचा २२ सेकंदांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवारातील एक भगिनी त्याच्या कपाळावर टिळा लावते. कपाळाला दीदीचा स्पर्श झाल्यावर हरीश डोळ्यांनी काहीतरी इशारा करतो, त्याचे ओठही थरथर करतात. हरीशचा हा व्हिडीओ लोकांना भावूक करतो आहे.
११ मार्चला सर्वोच्च न्यायालयाने दिली इच्छामराणची संमती
हरीशला ११ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची संमती दिली आहे. त्याचं कुटुंब प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराशी जोडलेलं आहे. हरीशला जेव्हा गाझियाबाद या ठिकाणी असलेल्या एम्स रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याचे आई वडील,भाऊ सगळेच लोक तिथे उपस्थित होते. त्या सगळ्यांचे डोळे पाणावले होते. हरीशचे वडील अशोक राणा यांनी उपस्थित सगळ्यांची माफी मागितली आणि म्हणाले आमची इच्छा नाही तरीही हे पाऊल आम्हाला उचलावं लागतं आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील ३२ वर्षीय हरीश राणा एका दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. २०१३ मध्ये वयाच्या २०व्या वर्षी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्यापासून हरीश राणा निष्क्रिय अवस्थेत बेडवर पडून आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी सर्व उपचार करूनही हरीश बरा होण्याची शक्यता नसल्याचा दावा त्याच्या आई-वडिलांनी केला. मुलाला होत असलेल्या असह्य यातना सहन होत नसल्याने त्याला इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी याचिका हरीशच्या आई-वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली.
हरीशची वैद्यकीय स्थिती बरी होण्यासारखी मुळीच नसल्याने इच्छा मरणाचा निर्णय
हरीशला क्वाड्रिप्लेजिया हा दुर्धर आजार झाला असून, त्याच्या संपूर्ण शरीराला १०० टक्के अपंगत्व आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा अवस्थेतील रुग्णांच्या उपचारांचा आर्थिक बोजा अत्यंत मोठा असतो. “आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्येक जण शर्थीचे प्रयत्न करतो. मात्र, अशा व्यक्तीवरील उपचारांचा खर्च प्रचंड आहे आणि रुग्णाचे बरे होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर अनेक कुटुंबे स्वत:हून उपचार थांबविण्याचा निर्णय घेतात,” असे हैदराबादमधील केअर रुग्णालयातील अपघातग्रस्त विभागाचे प्रमुख डॉ. भवानी प्रसाद गुडवल्ली यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. हरीश राणाची स्थिती बरी होण्यासारखी नाही त्यामुळे त्याला इच्छामरण मिळावं अशी मागणी करण्यात आली होती. जी ११ मार्चला सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.
