Harish Rana Euthanasia Death Last Rites: सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची परवानगी दिल्यानंतर हरीश राणा या ३२ वर्षीय तरुणाचा मंगळवारी एम्स रुग्णालयात मृत्यू झाला. न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाची (पॅसिव्ह युथनेशिया) परवानगी दिल्याची भारतातील ही पहिलीच घटना आहे. बुधवारी सकाळी हरीशवर शोकाकुल वातावरणात दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. १३ वर्षे कोमात असलेलआ हरीश अखेर अनंतात विलीन झाला असला तरी अवयव रुपाने तो जिवंत राहणार आहे.

एम्स रुग्णालयात मृत्यू

हरीश राणाचा सायंकाळी चार वाजून १० मिनिटांनी मृत्यू झाल्याचे एम्स रुग्णालयाने वैद्यकीय बुलेटीन काढून जाहीर केले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली हरीशची जीवनरक्षक प्रणाली काढून त्याला सुरु असणारे औषधे देखील बंद करण्यात आली होती. मृत्यू झाल्याची माहिती दिल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने हरीशला श्रद्धांजली अर्पण करत पालक आणि नातेवाईकांना धीर दिला. 

नेत्रपटल आणि हृदयाची झडप दान

हरीश राणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. कुटुंबियांनी हरीशचे अवयव दान करण्याचा निर्णय घेत नेत्रपटल आणि हृदयाची झडप दान केले. यामुळे एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी परत मिळण्यास मदत होईल, तर हृदयाच्या झडपमुळे गंभीर हृदयरोग असलेल्या रुग्णाला निरोगी जीवन जगण्याचा आधार मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला हरीश राणाला इच्छामरणाची परवानगी दिली. १३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरीशच्या इच्छामरणासाठी त्याच्या पालकांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. हरीशचा उपचार वैद्यकीयदृष्ट्या शक्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. यामुळे हतबल झालेल्या आणि उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पालकांनी हरीशच्या इच्छामरणासाठी न्यायालयात अर्ज केला होता. २०१३ मध्ये हरीश इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन कोसळून गंभीर जखमी झाला होता.

न्यायालयासाठी देखील भावनिक निर्णय

निष्क्रिय इच्छामरणात व्यक्तीचा जीवनरक्षक प्रणाली काढून टाकली जाते तसेच, औषधं बंद केली जातात. यामुळे व्यक्तीचा नैसर्गिक पद्धतीने मृत्यू होतो. न्यायालयाने हा निर्णय दिला त्यावेळी न्यायाधीशांना देखील अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, उपचार सुरु ठेवल्याने रुग्ण बरा होण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हरीश राणा पंजाब विद्यापीठात बी.टेकचे शिक्षण घेत होता. पण, अपघातानंतर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो कोमामध्ये गेला तो कायमचा.