भाजप-काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोप
राजकीयदृष्टय़ा संवेदनशील बनलेल्या उत्तराखंडमध्ये आणखी एका नव्या ‘स्टिंग ऑपरेशन’च्या व्हिडीओमुळे माजी मुख्यमंत्री हरीश रावत हे पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरले असून घोडेबाजार आणि ‘ब्लॅकमेलिंग’च्या आरोपांना ऊत आला आहे. रावत हे आमदारांना ‘विकत घेण्याचा’ प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे, तर आपले दूरध्वनी ‘टॅप’ होत असल्याचा दावा रावत यांनी केला आहे.
हरीश रावत यांना पुन्हा वादाचे लक्ष्य बनवणारा एक स्टिंग व्हिडीओ एका दूरचित्रवाहिनीने रविवारी प्रक्षेपित केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले. या व्हिडीओमध्ये काँग्रेसचे बंडखोर आमदार हरकसिंग रावत आणि काँग्रेसचे आमदार मदनसिंग बिश्त यांच्यातील संभाषण दाखवले आहे. आपल्या कळपातील आमदार एकत्र ठेवण्यासाठी हरीश रावत हे खाणकाम उद्योगातून मिळवलेला पैसा देत असल्याचे बिश्त हे हरकसिंग यांना म्हणत असल्याचे यात दिसत आहे.
हरीश रावत हे स्वत: घोडेबाजारीत गुंतले असल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट झाले असल्याचा आरोप भाजपचे नेते भगतसिंग कोशियारी यांनी केला. यापूर्वीच्या व्हिडीओनेही हे सिद्ध झाले होते आणि आताच्या व्हिडीओत तर मुख्यमंत्री स्वत:च्या आमदारांना समजावण्यासाठी २५ ते ३० लाख रुपये देत असल्याचे खुद्द आमदारच सांगत आहेत, असा दावा कोशियारी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला.
मंगळवारच्या विश्वासदर्शक ठरावापूर्व भाजप हरीश रावत यांच्याविरुद्ध कट रचत असल्याचा प्रत्यारोप काँग्रेसने केला. भाजपचे नेते आणि उत्तराखंडचे प्रभारी कैलास विजयवर्गीय हे राज्यातील राजकीय वातावरण ‘दूषित करण्याचा’ प्रयत्न करत असल्यामुळे शक्तिपरीक्षण होईस्तोवर त्यांना राज्यापासून दूर ठेवावे अशी मागणी पक्षाने राज्यपाल के. के. पॉल यांना एका पत्राद्वारे केली आहे.
आपल्यासह आपले नातेवाईक व अनुयायी यांचे दूरध्वनी टॅप केले जात असल्याचा आरोप उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केला आहे. केंद्रीय संस्था काँग्रेसच्या लोकांना निरनिराळ्या मार्गाने त्रास देत असल्याचेही ते म्हणाले. आपण नातेवाईक, हितचिंतक किंवा ओळखीचे असल्याचे भासवणाऱ्या संदेशवाहकांकडून आमचे आमदार व नेते यांना धमकीचे संदेश मिळत असून राष्ट्रविरोधी असल्यासारखी माझ्यावरही पाळत ठेवली जात आहे, असे रावत यांनी पत्रकारांना सांगितले.