उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांच्या निकटवर्तीयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) धडक कारवाई केली आहे. रावत यांचे वैयक्तिक सहाय्यक (PA) चंदन सिंग जिना यांच्या निवासस्थानावर ईडीने टाकलेल्या धाडीत लाखांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महागडी घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नयेत यासाठी हरिश रावत यांनी काँग्रेसच्या महत्त्वाच्या संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला आहे.
ED च्या कारवाईत नेमकं काय सापडलं?
उत्तराखंड दुय्यम सेवा निवड आयोगाद्वारे (UKSSSC) २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत विकास अधिकारी भरती प्रकरणातील गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार:
- रोख रक्कम: ३२ लाख रुपयांची बिनहिशोबी रोकड.
- सोने: १३ सोन्याची नाणी आणि ७ साखळ्या असे एकूण २००.५ ग्रॅम सोने.
- महागडी घड्याळे: रोलेक्स (Rolex), राडो (Rado), पियाजे (Piaget) आणि टिसॉट (Tissot) यांसारख्या लक्झरी ब्रँड्सची १२ महागडी घड्याळे.
- बँक खाती गोठवली: जिना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या खात्यांमधील ५२.१६ लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेत कसा झाला गैरव्यवहार?
२०१६ मधील भरती परीक्षेत उत्तरपत्रिका (OMR Sheets) मुख्य कक्षातून बाहेर काढून अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी नेल्याचा आरोप आहे. तिथे रिकाम्या ठेवलेल्या उत्तरपत्रिकांवर रोल नंबर लिहून खासगी कॉम्प्युटर एजन्सीच्या मदतीने त्यात फेरफार करण्यात आला. या कामासाठी मध्यस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार झाल्याचा दावा ईडीने केला आहे.
“पक्षाच्या लढ्याला धक्का लागू नये म्हणून पद सोडतोय”
या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सविस्तर भूमिका मांडत हरिश रावत यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. ते म्हणाले:
“माझ्या सहकाऱ्याच्या घरावर पडलेल्या धाडीमुळे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला बाधा पोहोचू नये, अशी माझी इच्छा आहे. राहुल गांधी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करत आहेत. अशा वेळी माझ्याशी जोडलेल्या कोणत्याही वादाचा पक्षाला फटका बसू नये; म्हणूनच मी उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कार्यकारी समिती आणि काँग्रेस कार्य समितीच्या (CWC) कायमस्वरूपी निमंत्रित सदस्यपदाचा राजीनामा देत आहे.”
आरोपांवर विश्वास नाही
रावत यांनी जिना यांचे वर्णन अतिशय नम्र आणि कष्टाळू व्यक्ती असे केले. “जिना यांच्यावर झालेले आरोप खरे ठरले तर ती माझ्यासाठी शरमेची बाब असेल, पण सध्या तरी मला या आरोपांवर अजिबात विश्वास नाही,” असेही रावत यांनी स्पष्ट केले.
उत्तराखंडच्या राजकारणात खळबळ
चंदन सिंग जिना हे २०१४ ते २०१७ या काळात हरिश रावत मुख्यमंत्री असताना त्यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून कार्यरत होते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस समर्थकांकडून केला जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार निशाना साधला आहे.
