पीटीआय, नवी दिल्ली
नामनिर्देशित सदस्य हरिवंश यांची शुक्रवारी सलग तिसर्या कार्यकाळासाठी राज्यसभेचे उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी मांडलेला आणि एस. फांगनोन कोन्याक यांनी अनुमोदन दिलेला, हरिवंश यांचा उपसभापतीपदी निवडीबाबतचा प्रस्ताव आवाजी मताने मंजूर झाला.
हरिवंश यांची उपसभापतीपदी निवड करण्यासाठी एकूण पाच प्रस्ताव मांडण्यात आले. ‘हरिवंशजी यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात आली आहे, असे मी घोषित करतो’, असे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर म्हटले. यानंतर सभापती राधाकृष्णन यांनी सभागृह नेते नड्डा, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना उपसभापतींसाठी निश्चित केलेल्या आसनापर्यंत हरिवंश यांना नेण्याचे आवाहन केले. यानंतर त्या दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत, हरिवंश यांना विरोधी पक्षनेत्यांच्या शेजारील आसनावर नेले.
९ एप्रिल रोजी हरिवंश यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर राज्यसभेचे उपसभापतीपद रिक्त झाले होते. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली.
