Air India Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. एकूण २६५ जणांनी या अपघातात प्राण गमावले आहेत. काहींनी कुटुंबातील प्रिय व्यक्ती तर काहींनी संपूर्ण कुटुंबच गमावले. हरप्रीत कौर होरा (३०) यांची कहाणी अधिक करूण आहे. हरप्रीत कौर होरा या १९ जून रोजी लंडनला निघणार होत्या. पण पतीचा वाढदिवस १६ जून रोजी असल्यामुळे त्यांना सरप्राईज देण्यासाठी हरप्रीत कौर यांनी १२ जूनचे एअर इंडियाचे विमान प्रवासासाठी निवडले आणि तिथेच अनर्थ घडला.
गुरुवारी (१२ जून) अहमदाबाद येथून विमान पकडण्यासाठी हरप्रीत कौर घरून निघाल्या. तेव्हा त्यांच्या कौटुंबिक व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘हॅप्पी जर्नी हरप्रीत बेटा’ असा मेसेज नातेवाईकांनी टाकला. पण हा शेवटचा संदेश ठरेल, असे कुणालाही वाटले नव्हते.
हरप्रीत कौर यांनी आधी १९ जून रोजीचे तिकीट काढले होते. त्यांचे पती रॉबी हे लंडनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांना भेटण्यासाठी हरप्रीत लंडनला जात होत्या. १६ जून रोजी येणारा वाढदिवस एकत्र साजरा करता यावा, यासाठी त्यांनी तिकीट बदलून घेतले.
गुरूवारी एअर इंडियाचे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाले. हरप्रीत कौर या २२इ या सीटवर बसल्या होत्या. टेक ऑफ नंतर अवघ्या ३० सेकंदात विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले.
वडिलांसाठी बंगळुरू ऐवजी अहमदाबाद निवडले
आणखी एक दुर्दैवी योगायोग म्हणजे हरप्रीत कौर या बंगळुरूत आयटी कंपनीत काम करतात. पण त्यांचे माहेर अहमदाबादमध्ये आहे. वडिलांवर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना भेटून अहमदाबादवरूनच विमान पकडावे, अशी योजना त्यांनी आखली होती. इतर वेळी त्या बंगळुरूवरूनच लंडनसाठी विमान घेत होत्या.
हरप्रीत कौर यांचे सासरे हरजीत सिंग होरा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, हरप्रीतने माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याची योजना आखली होती. ती यापूर्वी अनेकदा लंडनला गेलेली आहे. पण यावेळी या दुर्दैवी अपघातात तिला प्राण गमवावे लागले. ती कायमची आमच्यातून निघून गेली.
ज्या व्हॉट्सॲप ग्रुपवर गुरुवारी सकाळी हरप्रीतला शुभेच्छा दिल्या गेल्या त्या ग्रुपवर काही तासांतच शांतता पसरली. अनेकांना हरप्रीतच्या मृत्यूचा धक्का बसला. हरप्रीत कौर यांचे २०२० साली लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांनी पतीसह १५ महिने लंडनमध्ये घालवले. त्यानंतर स्वतःचे करीअर घडविण्यासाठी त्या बंगळुरूत नोकरीला लागल्या होत्या.