हरीश राणाला सर्वोच्च न्यायालयाने इच्छामृत्यूची संमती दिली आहे. इच्छामृत्यूची संमती मिळालेला हरीश राणा हा भारतातला पहिलाच व्यक्ती आहे. मागील १३ वर्षांपासून तो कोमामध्ये असल्याने आणि त्याच्यावर उपचार शक्य नसल्याने त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी इच्छामृत्यूची मागणी केली. जी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. इच्छामृत्यूच्या प्रक्रियेसाठी हरीशला रुग्णालयात आणण्यात आलं. त्याआधी त्याच्या घरातल्या एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या सिस्टर लवली यांनी घरुन निघण्यापूर्वी हरीशच्या कपाळावर गंध लावलं. “हरीश अब जाओ.. सबको माफ करते हुऐ और सबसे माफी मांगते हुए ठीक है” असं त्या म्हणाल्या होत्या. हा व्हिडीओ व्हायरलही झाला होता. कोण आहेत सिस्टर लवली त्यांनी जे सांगितलं त्याचा अर्थ काय? आपण जाणून घेऊ.

सिस्टर लवली यांनी काय सांगितलं?

सिस्टर लवली म्हणाल्या की हरीश राणा आणि त्याचं कुटुंब १८ वर्षांपासून प्रजापिता ब्रह्मकुमारी कुटुंबाशी संलग्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हरीशला इच्छामृत्यूची संमती दिली तेव्हा आम्ही राणा कुटुंबाला अध्यात्मिक साधनेसाठी बोलवलं. आम्हाला हे वाटत होतं की हरीश जेव्हा जग सोडून जाईल तेव्हा त्याच्या मनात कुठलंही दुःख किंवा अपराध राहायला नको. त्यामुळेच मी असं म्हणाले की हरीश अब जाओ.. सबको माफ करते हुऐ और सबसे माफी मांगते हुए ठीक है एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सिस्टर लवली यांनी ही माहिती दिली. तसंच घरातून निघताना हरीशच्या कपाळावर मी जो टिळा लावला तो शांतता, सकारात्मक उर्जा यांचं प्रतीक आहे असंही त्या म्हणाल्या.

हरीशच्या आईसाठी निर्णय कठीण होता

हरीश मागील १३ वर्षांपासून कोमात होता. त्याच्या आईने म्हणजेच निर्मला देवी यांनी त्याची अहोरात्र सेवा केली. त्याचे वडील अशोक राणा कचले होते. मात्र आई खचली नाही. आईला वाटत होतं की आपला मुलगा बरा होईल. पण अखेर काळजावर दगड ठेवून त्यांनी इच्छामृत्यूचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी हा निर्णय घेणं खूप कठीण होतं. आपल्या मुलाला आणखी वेदना होऊ नयेत म्हणून निर्मला देवी यांनी हा निर्णय घेतला असं सिस्टर लवली यांनी सांगितलं.

एका अपघाताने बदललं हरीशचं आयुष्य

हरीश राणा हा एक महत्त्वाकांक्षी आणि सक्रिय तरुण होता. एका अपघाताने त्याचं आयुष्य संपूर्णपणे बदलून गेलं. त्याच्या उपचारासाठी त्याच्या कुटुंबाने पाण्यासारखा पैसा खर्च केला. राणा कुटुंबाने त्यांचं तीन मजली घरही विकलं. तसंच हरीशवर नीट उपचार करता यावेत म्हणून हे कुटुंब पाच वर्षांपूर्वी गाझियाबाद या ठिकाणीही शिफ्ट झालं. अनेक वर्षांपासून हरीश फिडिंग ट्युबवर आणि मशीन्सवर जिवंत होता. लाखो रुपये खर्च केल्यानंतर कुठलीही सुधारणा झाली नाही ज्यानंतर कुटुंबाने त्याला इच्छामृत्यू देण्यात यावा अशी विनंती केली. तीन वर्षांचा लढा दिल्यानंतर ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.

सिस्टर लवली कोण आहेत?

सिस्टर लवली या प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराच्या सदस्या आहेत.

आध्यात्मिक साधना कशी करायची ते सिस्टर लवली शिकवतात.

हरीशचं कुटुंब प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराशी संलग्न आहे. तिथेच त्यांची ओळख सिस्टर लवली यांच्याशी झाली.