“८०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणतात, आता भाजपाकडून…”, हरसिमरत कौर बादल यांनी साधला निशाणा!

हरसिमरत कौर बादल यांची कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर शेतकरी आंदोलकांच्या मुद्द्यावरून टीका.

harsimrat kaur badal on captain amrinder singh
हरसिमरत कौर बादल यांची कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीका

काही दिवसांपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली होती. त्यापाठोपाठ नवजोत सिंग सिद्धू यांनी आधी दिलेला प्रदेशाध्यपदाचा राजीनामा आणि नंतर पुन्हा मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्यासोबत वाद मिटल्यानंतर राजीनामा मागे घेणं यामुळे पंजाबमध्ये राजकीय वादाचं महानाट्य पाहायला मिळालं. मात्र, यानंतर आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नव्या पक्षाची घोषणा करून भाजपासोबत युतीचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात विरोधी बाकांवर असलेल्या शिरोमणी अकाली दलानं परखड शब्दांमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या भूमिकेवर टीका करताना शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून त्यांना सुनावलं आहे. “जेव्हा लोकांनी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलं, तेव्हा सुनील जखार म्हणाले की तुम्ही शेतकऱ्यांना दिल्लीपर्यंत घेऊन जाल. याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांचा वापर केलात. आज आम्ही बघू शकतो की कुठल्या थरापर्यंत तुम्ही भाजपाचा अजेंडा पूर्ण केला आहात”, असं कौर म्हणाल्या.

“त्यांच्यात डील झाली होती”

भाजपा आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात डील झाल्याचा आरोप हरसिमरत कौर यांनी केला आहे. “कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपासोबत ज्या पातळीपर्यंत तडजोड केली आहे, ते पाहाता हे स्पष्ट होत आहे की त्यांच्यात डील झाली होती. स्वीस बँकेतील त्यांचे अकाऊंट आणि ईडी-आयटीच्या त्यांच्याविरुद्धच्या केसेस ते मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच बासनात बंद करण्यात आल्या”, असा आरोप हरसिमरत कौर यांनी केला आहे.

“पंजाबमधली शेती मोदी-शाह यांच्या हवाली केली”

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबमधली शेती मोदी-शाह यांच्या हवाली केल्याची देखील टीका हरसिमरत कौर यांनी केली आहे. “पंजाबचे मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत, की त्यांनी पंजाबमधली शेती मोदी-शाह यांच्या हवाली केली आणि इथला शेती उद्योग थांबवून टाकला. ८०० शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर आज कॅप्टनसाहेब म्हणतात, की ते हा प्रश्न भाजपाच्या माध्यमातून सोडवतील”, अशा शब्दांत कौर यांनी तोफ डागली.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर काही काळ शांत राहणंच पसंत केलं होतं. या काळात कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नवीन पक्ष काढण्याची घोषणा केल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी नव्या पक्षस्थापनेनंतर भाजपासोबत युती करण्याचे संकेत त्यांनी दिल्यामुळे पंजाबमध्ये नव्या राजकीय समीकरणांचा अंदाज बांधला जाऊ लागला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harsimrat kaur badal targets captain amrinder singh on alliance with bjp in punjab pmw

Next Story
मोदी सरकाराच्या काळाात ३५ हजार उद्योजक हे देश सोडून गेले, पं. बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांची टीका
फोटो गॅलरी