Haryana Assembly Election : हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यात ५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. हरियाणात भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीमध्ये भाजपाने अनेकांना धक्का दिला आहे, तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
भाजपाने हरियाणातील दोन मंत्री आणि तब्बल सात विद्यमान आमदारांचं तिकीट कापल्यामुळे भाजपाच्या गोटात नाराजी पसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र, या यादीत दोन मंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मोहन बडोली यांच्यासह सात आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. तसेच काही मतदारसंघात उमेदवारही बदण्यात आले आहेत. तसेच भाजपाने दोन मुस्लीम उमेदवारांनाही मैदानात उतरवलं आहे. ज्या दोन मत्र्यांना तिकीट देण्यात आलं नाही त्यामध्ये बडखलमधील विद्यमान आमदार, शिक्षण मंत्री सीमा त्रिखा आणि बावलमधील सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. बनवारी लाल यांच्या नावाचा समावेश आहे.
भाजपा की केन्द्रीय चुनाव समिति ने आगामी हरियाणा विधानसभा चुनाव 2024 के लिए अपनी दूसरी सूची में निम्नलिखित नामों पर स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/om6LcXx0Ug
— Haryana BJP (@BJP4Haryana) September 10, 2024
हेही वाचा : Sushilkumar Shinde : “मी तेव्हा जम्मू-काश्मीरला जायला घाबरलो होतो”, सुशीलकुमार शिंदेंचं विधान चर्चेत
मंत्री बनवारीलाल यांच्या जागी आता कृष्ण कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच बडखलमध्ये भाजपाने सीमा त्रिखा यांच्या जागी धनेश अडलाखा यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, भाजपाने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या ६७ उमेदवारांच्या पहिल्या यादीमुळे पक्षांतर्गत नाराजी पसरली होती. त्यानंतर मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या उमेदवारांच्या यादीमुळेही पक्षात नाराजी पसरल्याची चर्चा आहे. यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य शिवकुमार मेहता यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. भाजपाने ४ सप्टेंबर रोजी ६७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर आता दुसरी यादी जाहीर केल्यानंतर तिकीट न मिळाल्याने आमदारांसह मंत्र्यांसह मोठी नाराजी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.