Minister Vs Women IPS : हरियाणा सरकारमधील कॅबिनेट मंत्री अनिल विज आणि कैथलच्या एसपी उपासना सिंह यांच्यामध्ये एका बैठकीत जोरदार वाद झाल्याची घटना घडली आहे. भर बैठकीतच मंत्री अनिल विज यांनी एसपी उपासना सिंह यांच्यावर संताप व्यक्त केला, तर एसपी उपासना सिंह यांनी देखील भर बैठकीत मंत्री अनिल विज यांना जशास-तसं उत्तर दिलं. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
एका जमीन वादाच्या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी कैथलच्या पोलीस अधीक्षक उपासना सिंह यांना दिले. मात्र, संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यास उपासना सिंह यांनी नकार दिल्यानंतर बैठकीत जोरदार वाद झाला.
अनिल विज यांनी म्हटलं की, “या प्रकरणात कारवाई होईपर्यंत त्यांना (एएसआय) निलंबित करण्याचे आदेश मी देत आहे, कारण या प्रकरणात ते त्यांच्या पदाचा गैरवापर करू शकतात.” मंत्री अनिल विज यांच्या या आदेशावर बोलताना आयपीएस उपासना सिंह यांनी म्हटलं की, “संबंधित अधिकारी शेजारच्या जिल्ह्यातील आहे आणि ते क्षेत्र माझ्या प्रशासकीय क्षेत्रात येत नाही. त्यामुळे मला त्यांना निलंबित करण्याचा अधिकार नाही. या प्रकरणात कुरुक्षेत्र एसपी निलंबनाचा आदेश जारी करू शकतात.”
#WATCH | Kaithal | Haryana Minister Anil Vij got angry at District Superintendent of Police Upasana after she refused to carry out his orders to suspend a police officer in a land sale fraud case, saying, "It is not in my power to do so."
— ANI (@ANI) February 13, 2026
The altercation happened during a… pic.twitter.com/By9lAcrmi1
उपासना सिंह यांनी दिलेल्या या उत्तरानंतर मंत्री अनिल विज यांनी त्यांच्या सूचनांचं पालन करण्याचा आग्रह धरला. मंत्री अनिल विज म्हणाले की, मी त्याच्या (एएसआय) निलंबनाचे आदेश देत आहे आणि तुम्ही आवश्यक त्या कारवाईसाठी डीजीपीला पत्र लिहा. मात्र, तरीही पोलीस अधीक्षक उपासना सिंह या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्या आणि म्हणाल्या की, “मी हे लिहू शकते. पण मी (एएसआय) ला निलंबित करू शकत नाही.”
त्यानंतर मंत्री अनिल विज हे भर बैठकीत संतापले आणि वाद वाढला. मंत्री अनिल विज पुढे म्हणाले की, “तुम्ही प्रत्येक कामात असं करता. मी तुम्हाला त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देत आहे. तुम्ही डीजीपींना पत्र लिहा, मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला माझे आदेश पाळावे लागतील. कारण माझे आदेश संपूर्ण हरियाणामध्येही पाळले जातात.”

