Haryana Accident : हरियाणा राज्यातील फरिदाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. फरिदाबादला जोडणाऱ्या जेवर एक्सप्रेसवेवरील उड्डाणपुलाच्या बांधकामा दरम्यान क्रेन कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी घडली आहे. यामध्ये अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जेवर एक्सप्रेसवेवरील एका उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू होतं. यावेळी एका अवजड क्रेनचा अचानक तोल गेला आणि क्रेन खाली कोसळली. या क्रेनच्या खाली बांधकाम स्थळावरील काही कामगार अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे बांधकामाच्या ठिकाणी चिखल आणि जमीन निसरडी झाली होती. मात्र, पाऊस थांबल्यानंतर कामगारांनी पुन्हा आपलं काम सुरू केलं होतं. पण अचानक उड्डाणपुलासाठी गर्डर उचलत असताना क्रेनचा तोल गेला आणि ती जमिनीवर कोसळली. यावेळी घटनास्थळी सुमारे ६-७ कामगार उपस्थित होते. त्यामुळे क्रेनखाली काही कामगार अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

अपघात कशामुळे घडला? चौकशी होणार

दरम्यान, जेवर एक्सप्रेसवेवरील उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान क्रेन कोसळल्याची दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या घटनेत जखमी झालेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच ही दुर्घटना घडल्यानंतर तात्पुरतं बांधकाम थांबवण्यात आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच बचावकार्य पूर्ण झाल्यावर कामगारांच्या प्रकृतीबद्दल स्पष्ट माहिती समोर येईल. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी गावकरी आणि स्थानिक रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.