Haryana’s Faridabad Murder News : हरियाणातील फरीदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका बेरोजगार इसमाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिचा मृतदेह पलंगामध्ये लपवून ठेवला होता. पोलिसांनी या हत्येप्रकरणी मंगळवारी (३० एप्रिल) आरोपीस अटक केली आहे. महिलेचा मृतदेह शनिवारी फरीदाबादमधील जवाहर कॉलोनीमधील त्यांच्या भाड्याने राहत असलेल्या घरातील पलंगामध्ये सापडला होता. पोलिसांना हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला होता. या महिलेचं नाव सोनिया असं होतं.

पोलिसांनी सांगितलं की ४० वर्षीय सोनिया गेल्या १० वर्षांपासून ४९ वर्षीय आरोपी जितेंद्र उर्फ बॉबीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. सोनियाच्या पतीचा व जितेंद्रच्या पत्नीचा आधीच मृत्यू झाला आहे. आपल्या जोडीदारांना गमावल्यानंतर काही वर्षांनी जितेंद्र व सोनिया एकत्र आले व दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. जितेंद्रचं पूर्वी एक कपड्यांचं छोटंसं दुकान होतं.

आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी

या घटनेची व आरोपींची माहिती देताना पोलिसांनी सागितलं की आरोपीला क्राइम ब्रँचने झज्जर येथील गोछी या गावातून अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाे त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जितेंद्र व सोनिया ज्या घरात भाड्याने राहत होते, त्या घराचे मालक सुरेंद्र सिंह यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे हे हत्येचं प्रकरण उघडकीस आलं. दोघेही एक वर्षापासून त्या घरात राहत होते.

तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर आरोपीला बेड्या

सुरेंद्र यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की शुक्रवारी त्यांना त्यांच्याच एका भाडेकरूचा फोन आला होता जो जितेंद्रच्या घराशेजारी राहत होता. त्याने सुरेंद्र यांना सांगितलं की जितेंद्रच्या घरातून खूप घाणेरडा वास येतोय. हे घर अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यानंतर सुरेंद्र यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना या घरात सोनियाचा सडलेला मृतदेह सापडला. त्याच दिवशी पोलिसांनी सारन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जितेंद्र आधीच फरार होता. त्यानंतर तीन दिवस पोलिसांनी जितेंद्रचा शोध घेतला. अखेर मंगळवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

आरोपीने शेजाऱ्यांना सांगितलं की घरात उंदीर मरून पडलाय

पोलीस चौकशीत जितेंद्र याने गुन्हा कबूल केला आहे. तसेच त्याने सांगितलं की खून केल्यानंतर त्याने त्याच्या आईला याबद्दल माहिती दिली होती. आरोपीने पोलिसांसमोर सांगितलं की २१ एप्रिल रोजी त्याने सोनियाला तिच्या आधीच्या पतीपासून झालेल्या मुलीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यामुळे त्याचं व सोनियाचं मोठं भांडण झालं. याच भांडणादरम्यान त्याने सोनियाचा गळा दाबून तिला ठार मारलं. त्यानंतर तिचा मृतदेह कपड्यांमध्ये गुंडाळून पलंगाच्या कप्प्यात ठेवला. मृतदेहाचा वास बाहेर जाऊ नये यासाठी त्याने दोन तीन दिवस घरात अगरबत्त्या जाळल्या. मृतदेह सडून खूपच दुर्गंधी पसरल्यानंतर जितेंद्रने घराला कुलुप लावलं आणि तिथून पळून गेला. तो घर सोडून पळून जाण्यापूर्वी शेजाऱ्यांनी त्याच्या घरातून येणाऱ्या दुर्गंधीबद्दल त्याला प्रश्न विचारला तेव्हा त्याने शेजाऱ्यांना सांगितलं की घरात उंदीर मरून पडला आहे.