Haryana Govt says replace Good Morning with Jai Hind: हरियाणा सरकारकडून गुरुवारी राज्यातल्या सर्व शाळांना नवे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांनी रोज सकाळी ‘गुड मॉर्निंग’ म्हणण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यास सांगण्यात आले आहेत. येत्या १५ ऑगस्टपासूनच नवे आदेश लागू होणार आहे. या आदेशांचं पत्र सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी, ब्लॉक शिक्षण अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक यांना पाठण्यात आले आहे. मात्र, या आदेशांची सक्ती शाळांवर करण्यात आली नसून या मार्गदर्शक सूचना असल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

नेमके काय आहेत आदेश?

हरियाणा सरकारने राज्यातील शाळांमधून ‘गुड मॉर्निंग’ असं बोलून अभिवादन करण्याचा इंग्रजी प्रघात बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याऐवजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना किंवा शिक्षकांना अभिवादन करताना ‘जय हिंद’ म्हणावं, असं या सरकारी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. “विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व देशाभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय ऐक्याविषयी आणि देशाच्या जाज्वल्य इतिहासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना जोपासली जाईल”, असं या पत्रकात म्हटलं आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती सुरुवात

दरम्यान, अभिवादन करण्यासाठी ‘जय हिंद’ म्हणण्याची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केल्याचं मानलं जातं. हीच पद्धत पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय लष्करानंही स्वीकारली. “जय हिंद या शब्दांमधून प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक सीमारेषा अस्पष्ट होऊन वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांमध्ये एकतेचा विचार जोपासला जातो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीबरोबरच एकात्मतेची भावना निर्माण होईल”, अशी भूमिका सरकारकडून या पत्रकात मांडण्यात आली आहे.

Vinesh Phogat Rajyasabha Seat: फक्त ४ दिवसांच्या फरकामुळे विनेश फोगटला राज्यसभा उमेदवारीचीही हुलकावणी; वाचा नियम काय सांगतो!

सक्ती नाही, फक्त मार्गदर्शक सूचना

दरम्यान, ही सक्ती नसून फक्त मार्गदर्शक सूचना म्हणून जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती हरियाणा सरकारमधील एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली. “रोज योगा किंवा क्विझ करण्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक नियमावलीप्रमाणेच हे आदेश आहेत. असं न केल्यास कोणतीही शिक्षा नाही”, असं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे काही सरकारी अधिकाऱ्यांनी या नव्या सूचनांचं स्वागत केलं आहे.