काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या स्कायलाइट रिअ‍ॅल्टीज या कंपनीला हरयाणा सरकारने नोटीस दिली आहे. डीएलएफ या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनीबरोबर गुरगाव येथे वढेरा यांच्या कंपनीने जे जमिनीचे व्यवहार केले होते, त्याबाबत माहिती मागवण्यात आली असून त्याआधारे करवसुली केली जाणार आहे.

आम्ही स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीज या गुरगावच्या कंपनीला नोटीस दिली असून डीएलएफबरोबर केलेल्या जमीन व्यवहारांची माहिती मागितली आहे, असे हरयाणा अबकारी कर अधिकारी प्रताप सिंग यांनी सांगितले. कंपनीने २६ ऑक्टोबपर्यंत या नोटिशीला उत्तर देणे अपेक्षित आहे. नोटिशीत म्हटले आहे की, शहर नियोजन खात्याने ज्या नोंदी दाखवल्या आहेत, त्यानुसार कंपनीला गुरगाव येथे व्यावसायिक प्रकल्पासाठी २००८ मध्ये परवाना देण्यात आला होता. त्यानंतर माहिती गोळा केली असता हा परवाना कंपनीने डीएलएफला ५८ कोटी रुपये घेऊन विकला होता. जमीन विक्री करताना कंपनीने परवानाही विकला ही गंभीर बाब आहे. हरयाणा मूल्यवर्धित कर कायदा २००३ मधील कलम २ (१) (आर) या तरतुदीनुसार विक्री मूल्यात परवाना विक्रीचा समावेशही आवश्यक आहे. हरयाणा अबकारी कर विभागाने वढेरा यांच्या कंपनीकडून डीएलएफला विकलेल्या एकूण जमिनीच्या मूल्याची माहिती मागवली आहे व व्हॅट अंतर्गत येणारे आणखी व्यवहार केलेत काय, याचाही विचारणा केली आहे. आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी वढेरा यांच्या कंपनीने डीएलएफला ३.५३ एकर जमीन विकल्याचा व्यवहार ऑक्टोबर २०१२ मध्ये रद्द केला होता.