हरियाणामध्ये नेहमीच चर्चेत असणारे सनदी अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मागच्या ३० वर्षात अशोक खेमका यांची ही ५५ वी बदली आहे. खेमका यांना आता मुख्य सचिव म्हणून अभिलेखागार विभागात पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्रात तुकाराम मुंडे यांची सतत बदली होत असल्यामुळे ते आता सर्वांनाच परिचित झाले आहेत. मुंडे यांच्यापेक्षाही खेमका यांच्या अधिक बदल्या झालेल्या आहेत. मुंडे यांच्याप्रमाणेच खेमका हे देखील आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> “दररोजच्या ८ मिनिटांच्या कामासाठी मला ४० लाख रुपये पगार”, IAS अधिकारी अशोक खेमकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले, “भ्रष्टाचार…”

याआधी कधी झाली होती बदली

अशोक खेमका यांची याआधी शेवटची बदली ऑक्टोबर २०२१ मध्ये झाली होती. अभिलेखागार, पुरातत्व आणि संग्रहालय विभागातून त्यांची बदली विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख सचिवपदी करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांना याच विभागातील एसीएस पदावर पदोन्नती देण्यात आली होती. आयएनएलडी (Indian National Lok Dal) सरकारच्या काळात खेमका यांची पाच वर्षात तब्बल ९ वेळा बदली झाली. एकदा तर त्यांना सरकारकडून मिळालेली गाडी देखील काढून घेण्यात आली. तरिही खेमका डगमगले नाहीत. ते घरापासून कार्यालयापर्यंत चालत ये-जा करत असत.

कोण आहेत अशोक खेमका?

अशोक खेमका १९९१ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्याआधी खेमका यांनी १९८८ मध्ये आयआयटी खरगपूर येथून शिक्षण घेतले. कंम्प्यूटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये ते टॉपर राहिले होते. त्यानंतर प्रशासकीय सेवेसाठी परिक्षा देऊन ते सनदी अधिकारी बनले. २०१२ साली अशोक खेमका यांची ख्याती देशभर पोहोचली. हरियाणामध्ये हुड्डा सरकार असताना सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्ड्रा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज डीएलएफच्या दरम्यान झालेल्या जमीन व्यवहाराचा करार त्यांनी रद्द केला होता. त्यावेळी केंद्रात युपीएचे सरकार आणि हरियाणात देखील काँग्रेच सरकार होते. अशा विपरीत राजकीय परिस्थितीतही खेमका यांनी घेतलेल्या खमक्या भूमिकेमुळे त्यांचे देशभर कौतुक झाले होते.

तुकाराम मुंढे यांची १६ वर्षात २० वेळा बदली

राज्यातील सनदी अधिकारी तुकाराम मुंढे सर्वांनाच परिचित आहेत. कडक शिस्त आणि करारी बाण्यामुले मुंढे यांचे सत्ताधाऱ्यांसोबत नेहमी संघर्ष होत असतो. त्यामुळे आपल्या कामासोबतच ते त्यांच्या बदलीसाठीही नेहमी चर्चेत राहतात. त्यांची १६ वर्षात २० वेळा बदली झाली आहे. २००५ साली तुकाराम मुंढे प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांची ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग झाली, त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या धडाकेबाज शैलीत कामकाज केले. त्यांची हीच शैली सामान्य लोकांमध्ये प्रसिद्ध असली तरी कर्मचारी वर्ग, सत्ताधारी यांना ती अडचणीची वाटते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana ias officer ashok khemka transferred for 55th time in 30 years kvg
First published on: 10-01-2023 at 11:56 IST