Man Spying for Pakistan: हरियाणामधील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ऊर्फ ज्योती रानीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर आता हरियाणामधून आणखी एका तरूणाला हेरगिरी केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या आठवड्यातली ही तिसरी अटक आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कारवाई हाती घेतल्यानंतर शनिवारी २६ वर्षीय तरूण अरमानला नूह पोलिसांनी अटक केली.

अरमानला नूह जिल्ह्यातील नगीना पोलीस ठाण्यात अटक झाली आहे. अरमान भारतीय सैन्य आणि इतर लष्करी कारवायांशी संबंधित संवेदनशील माहिती नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देत होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे.

नूह पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अरमान मुळचा राजका गावातील रहिवासी आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे आताच याबाबत अधिकची माहिती उघड करता येणार नाही. तसेच अरमानचा मोबाइल आणि इतर उपकरणांचे विश्लेषण करून माहिती गोळा केली जात आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

दरम्यान अरमानच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कुटुंबातील एका सदस्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, अरमान लहानपणापासून एक चांगला मुलगा होता. पोलिसांनी अद्याप आमची चौकशी केली नाही. सरकार त्याच्यावर काय आरोप करते, हे आम्हाला माहीत नाही. परंतु जे आरोप समोर आले आहेत, ते चुकीचे असल्याचे आम्हाला वाटते. आमचे पाकिस्तानमध्ये नातेवाईक आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्क असतो. कदाचित त्यामुळेच गोंधळ निर्माण झाला असेल.

हरियाणातून तिघांना अटक

तथापि, हरियाणातून हेरगिरीच्या आरोपाखाली ही पहिली अटक नाही. याआधी पोलिसांनी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली होती. ज्योतीने दोन वेळा पाकिस्तानला भेट देऊन तेथील अनेक व्हिडीओ केले होते. पाकिस्तानमधील गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरविल्याचा तिच्यावर आरोप आहे. ट्रॅव्हल विथ जो असे तिच्या यूट्यूब चॅनेलचे नाव असून २०२३ साली पाकिस्तानचा व्हिसा मिळवत असताना ती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच आठवड्याच्या सुरुवातीला पानिपतमधील एका कापड कारखान्यात काम करणारा २४ वर्षीय खासगी सुरक्षा रक्षक नौमन इलाही यालाही पाकिस्तानला माहिती दिल्याबद्दल अटक करण्यात आले होते. इलाही हा मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.