Haryana Panchkula School Case Bail: हरियाणातील पंचकुला येथील सरकारी शाळेत सहा वर्षांच्या विद्यार्थिनीवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या आठ वर्षांच्या मुलाला बाळ न्याय मंडळाने बुधवारी जामीन मंजूर केला. या घटनेचे व्हिडीओ आणि छायाचिन्तरे सोशल मीडियावरून हटवण्याचे निर्देशही मंडळाने दिले आहेत. अल्पवयीन मुलीची ओळख उघड होऊ नये आणि तिच्या गोपनीयतेचे संरक्षण व्हावे, यासाठी तिच्या वडिलांनी बाल न्याय – मुलांची काळजी व संरक्षण कायदा, २०१५ अंतर्गत याचिका दाखल केली होती. याबद्दलचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने आले आहे.
दरम्यान, आरोपी मुलाच्या वडिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणीदरम्यान त्यांचे वकील मनबीर सिंह राठी यांनी मुलाची यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे न्याय मंडळाला सांगितले. त्याला दीर्घकाळ निरीक्षणगृहात ठेवल्यास त्याच्या शिक्षणावर, शैक्षणिक प्रगतीवर आणि सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला.
समुपदेशन आणि पुनर्वसनाची जबाबदारी पालकांची
जामीन अर्जात मुलाच्या पालकांनी त्याला योग्य समुपदेशन, वर्तनविषयक मार्गदर्शन आणि पोषक कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. आपल्या कृतीचे परिणाम समजून घेऊन त्याच्या वर्तनात सुधारणा व्हावी, यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन पालकांनी दिले आहे. तसेच, सक्षम प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मुलाला समुपदेशन सत्रांना नियमित उपस्थित ठेवण्याची आणि पुनर्वसनाशी संबंधित उपाययोजना राबवण्याची जबाबदारीही पालकांनी स्वीकारली आहे.
सहा वर्षांच्या मुलीला विटेने मारहाण केल्याचा आरोप
ही घटना २८ ऑक्टोबर रोजी पंचकुला येथील एका सरकारी शाळेत घडली होती. शाळेतील रिकाम्या वर्गात तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाने बालवर्गात शिकणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याने विटेने मुलीच्या डोक्यावर वार केले, तिला वारंवार बाकावर आपटले, शाळेच्या टायने ओढत नेले आणि लाथाही मारल्या. या मारहाणीत मुलगी बेशुद्ध पडली होती. या घटनेत मुलीला अनेक दुखापती झाल्या. तिला तातडीने चंदीगड येथील पीजीआयएमईआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर बुधवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आरोपी मुलाला शनिवारी बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याला अंबाला येथील निरीक्षणगृहात पाठवण्यात आले होते.
राज्यातील शाळांच्या सुरक्षेचे ऑडिट करण्याचे आदेश
या घटनेमुळे परिसरात आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर हरियाणा सरकारने घटनेची परिस्थिती आणि कारणांचा तपास करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली. तसेच, राज्यातील सर्व शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचे सर्वंकष ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. शाळांमधील सुरक्षेतील त्रुटी शोधून आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही तपासणी केली जाणार आहे.
