चंडीगड : हरियाणात राज्यसभेच्या दोन जागांसाठी मध्यरात्रीपर्यंत राजकीय नाट्य रंगले. भाजपचे संजय भाटिया व काँग्रेसचे कर्मवीर सिंह बौध यांनी विजय मिळवला. मतफुटी, मतदानावेळी गोपनीयतेचा भंग असे आरोप करण्यात आले.
काँग्रेसचे बौध यांनी अपक्ष उमेदवार सतीश नंदल यांच्यावर चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. राष्ट्रीय लोकदलाचे दोन सदस्य अनुपस्थित होते. पाच मते बाद झाली. यामध्ये काँग्रेसची चार तर भाजप एक मत होते. भाटिया यांना प्रथम पसंतीची ३९ मते मिळाली. बौध यांना २८ तर नंदल यांना १६ मते पडली.
काँग्रेसची पाच मते फुटल्याचा अंदाज आहे. पक्षाचा आदेश धुडाकावून मतदान करणार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, असे पक्षाचे राज्य प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी स्पष्ट केले.
ओदिशात काँग्रेस आमदारांवर कारवाई
ओदिशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजप पुरस्कृत अपक्ष दिलीप रे यांना मतदान केले. त्यामुळे पक्षाने रमेशचंद्र जेना, दशरथी गोमांगो व सोफिया फिरदोस या तिघांना निलंबित केले.
