Haryana School Violence Case News Update: हरियाणातील एका शाळेत तिसरीच्या विद्यार्थ्याने केजीमधील एका विद्यार्थिनीवर दगड आणि कुंडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ती चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर तिला चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आधी दगडांनी हल्ला मग कुंडी उचलली
ही घटना पंचकुला येथील संस्कृती मॉडेल स्कूलमध्ये घडली. तिसरीतील विद्यार्थ्याने आधी मुलीवर दगडांनी हल्ला केला आणि नंतर कुंडी उचलून तिच्या डोक्यात मारली. एवढ्यावरच न थांबता त्या मुलाने तिला एका रिकाम्या वर्गात नेलं आणि तिथे तिचं डोकं वारंवार जमिनीवर व भिंतीवर आपटून मारहाण सुरूच ठेवली. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतरही तो तिला मारत राहिला आणि त्यानंतर तिचे केस पकडून तिला शाळेच्या आवारात ओढत नेले.
‘इंडिया टुडे’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाने मुलीला तुझ्या वडिलांना भेटवतो, असं आमिष दाखवून शाळेच्या पहिल्या मजल्यावर नेलं होतं. मात्र, दोघेही पहिल्या मजल्यावर पोहोचताच त्याने तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. हल्ल्यानंतर मुलीला तातडीने सेक्टर ६ मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, जखमांचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी तिला चंदीगडमधील पोस्टग्रेज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे पाठवण्यात आलं. सध्या तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक तातडीने शाळेत पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या परिस्थितीत आणि का झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सध्या शाळा प्रशासनाची चौकशी करत आहेत. तसंच, या घटनेमागील कारण समजून घेण्यासाठी संबंधित मुलाच्या पालकांचीही चौकशी केली जात आहे.
या घटनेमुळे शाळेच्या आवारातील मुलांची सुरक्षा आणि शाळा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या देखरेखीच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, घटनेचे सविस्तर तपशील मिळणं अद्याप बाकी आहे.
