हरियाणाच्या कैथल येथे माणुसकीला लाज वाटावी अशी एक घटना समोर आली आहे. मुलगी झाली म्हणून येथे एका आईने आपल्या बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिलं. पण, हे पाहून तिथले भटके कुत्रे भुंकू लागले. या भटक्या कुत्र्यांनी ते प्लास्टिक तोंडात पकडून बाहेर काढलं आणि चिमुकलीचा जीव वाचवला.


ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इथल्या डोगरन गेट भागामध्ये ही घटना घडलीये. या महिलेने मुलीला नाल्यामध्ये फेकल्यानंतर काही कुत्रे नाल्याजवळ पोहोचले आणि त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरूवात केली. ऐवढ्यावरच हे कुत्रे थांबले नाहीत तर थोड्याचवेळात या कुत्र्यांनी ते प्लास्टिक तोंडात पकडून बाहेर काढलं आणि पुन्हा भुंकण्यास सुरूवात केली. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवजा ऐकून रस्त्यावरुन जाणारे नागरीक जमा झाले आणि त्यांच्या  सर्व प्र कार लक्षात आला. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर नवजात चिमुकलीचा जीव वाचला. थोड्याचवेळात परिसरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली, आणि प्रत्येकजण घटना ऐकून अवाक् झाला होता. पोलसांनी या चिमुकलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. बाळाचं वजन 1 किलो 100 ग्राम असून ही चिमुकली जिवंत आहे पण तिची प्रकृती गंभीर असून वाचविण्याचे सर्वोतपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रकृती सुधारल्यानंतर तिला बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवलं जाणार आहे.

सध्या पोलीस चिमुकलीला फेकणाऱ्या त्या आईचा शोध घेत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.