नवी दिल्ली: देशात विविध राज्यांमध्ये होत असलेली द्वेषमूलक भाषणे आणि सामाजिक हिंसेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन धक्कादायक असल्याची टीका १३ प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी केली असून हिंसक घटनांमधील संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शनिवारी संयुक्त निवेदनाद्वारे केली.

देशातील सामाजिक हिंसेविरोधात मोदींनी शब्दही उच्चारलेला नाही, हेच सत्ताधारी व प्रशासनाकडून हिंसेला कारणीभूत असणाऱ्या सशस्त्र जमावाला अभय दिले जात असल्याचे द्योतक आहे. खाद्यपदार्थ, पोषाख, धार्मिक श्रद्धा, उत्सव, भाषा अशा विविध मुद्दय़ांवरून देशातील सत्ताधाऱ्यांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरात द्वेषमूलक भाषणांचे प्रकार वाढू लागले असून प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांना ‘सरकारी संरक्षण’ दिले जात आहे. सामाजिक तेढ वाढवण्याचा हा सूनियोजित कट असून द्वेषमूलक भाषणांद्वारे लोकांच्या भावना भडकल्यानंतर सशस्त्र धार्मिक मिरवणुका काढून धार्मिक हिंसा घडवल्या जात आहेत, अशी अत्यंत कडवी टीका निवेदनातून केली आहे.

शिवसेना, सप, बसप, ‘आप’विना निवेदन!

काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रमूकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री व झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपचे महासचिव डी. राजा आदी प्रमुख नेत्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केले आहे. मात्र, यामध्ये शिवसेना, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व आम आदमी पक्ष या पक्षांच्या प्रमुखांचा वा नेत्यांचा समावेश नाही!