उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक माजी सैनिक आणि त्याच्या पत्नीची घरातच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ५८ वर्षीय शमसुद्दीन आणि त्यांची पत्नी सड्डो बेगम यांचे मृतदेह रविवारी सकाळी त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घराचा मुख्य दरवाजा बराच वेळ बंद असल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला, तेव्हा घरातील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
गळ्यावर खोल गंभीर जखमा
हे दोघेही पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेले आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळ सील करण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दोघांच्या शरीरावर चाकूने अनेक वार करण्यात आले असून, त्यांच्या गळ्यावरही खोल गंभीर जखमा आढळल्या आहेत.
न्यायवैद्यक पथकाकडून पुरावे गोळा
या गंभीर गुन्ह्याची नोंद घेत पोलिसांनी तातडीने न्यायवैद्यक पथकाला घटनास्थळी बोलावून घेतले. पथकाकडून घरातील विविध ठिकाणांहून पुरावे आणि नमुने गोळा करण्यात आले. दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि हल्ल्याचे स्वरूप अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
हत्या का झाली? पोलिसांकडून तपास
या दुहेरी हत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिसांकडून शेजारी, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली जात आहे. घराच्या आसपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही पोलिसांकडून तपासले जात आहेत. घटनेपूर्वी किंवा घटनेनंतर संशयास्पद व्यक्ती अथवा काही हालचाली दिसल्या का, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, हत्येच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून आरोपी आणि हत्येमागील कारणाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
