पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी नीरव मोदी याला भारताच्या ताब्यात देण्यात यावे याबाबत हाँगकाँगकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, यावर त्यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले की, फरार आरोपींच्या समर्पणासाठी भारत आणि हाँगकाँगमध्ये परस्पर करार झालेला आहे. या अंतर्गतच आम्ही त्यांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहोत. मात्र, अद्याप हाँगकाँग प्रशासनाने यावर आम्हाला कुठलीही माहिती दिलेली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी संसदेत एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना सांगितले होते की, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हाँगकाँगच्या विशेष प्रशासकीय विभागाकडे तसेच पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाकडून नीरव मोदीच्या अटकेची मागणी केली होती. तसेच परराष्ट्र मंत्रालयाकडून नीरव मोदी आणि मोहुल चोक्सीचा पासपोर्टही रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती.

चीनने सोमवारी म्हटले होते की, स्थानिक कायदे आणि परस्पर कायदेविषयक सहकार्य कराराच्या आधारावर नीरव मोदीला अटक करण्याचा भारताचा प्रस्ताव हाँगकाँग स्विकारू शकते. नीरव मोदी सध्या हाँगकाँगमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. हाँगकाँग चीनच्या अधिपत्याखालील विशेष क्षेत्र आहे.

भारताच्या निवेदनावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेग शुआंग यांनी सांगितले होते की, योग्य कायद्यान्वये हाँगकाँग दुसऱ्या देशाला परस्पर सहकार्य करण्याची व्यवस्था करु शकते. त्यामुळे भारताच्या विनंतीवर विचार करुन हाँगकाँगमधील कायदे, प्रासंगिक कायदे यांचे पालन करुन भारताची जरुर मदत करेन.