TMC Split Updates: विधानसभेच्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाला फुटीचे ग्रहण लागले आहे. आधी ८० पैकी जवळपास ६० आमदारांनी बंड करून ममता बॅनर्जींचा निर्णय नाकारला. त्यानंतर आता २८ पैकी २० खासदार एकत्र आले असून त्यांनी केंद्रातील एनडीए सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. या खासदारांमध्ये माजी क्रिकेटपटू, खासदार युसूफ पठाण यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आल्यानंतर खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी ममता बॅनर्जींच्या विरोधात बंड पुकारले असून २० खासदारांचा पाठिंबा मिळवला आहे. सोमवारी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत एनडीए सरकारला पाठिंबा दर्शवला.

दिल्लीत एका बाजूला इंडिया आघाडीमधील घटकपक्षांची बैठक होत असताना दुसरीकडे दिल्लीतच तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी ही भूमिका घेतल्यामुळे ममता बॅनर्जींवर मोठी नामुष्की ओढवली.

तृणमूल काँग्रेसचे नेते ममता बॅनर्जींच्या विरोधात उघडपणे भूमिका घेत असताना कृष्णानगर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मात्र त्यांची साथ सोडलेली नाही. महुआ मोईत्रा यांनी ममता बॅनर्जींना ठामपणे पाठिंबा दर्शवला आहे. बंडखोर खासदारांच्या गटावर त्यांनी जोरदार टीका केली.

माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनीही बंडखोर गटाला साथ दिल्याचे समोर आल्यानंतर मोईत्रा संतापल्या. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, युसूफ पठाण दिल्लीला धावत गेलात कारण तुम्हाला अमित शाह यांचे बोलावणे आले. आमच्या जिल्ह्याने तुला भरभरून मतदान दिले आणि सर्वाधिक मताधिक्याने तुझा विजय झाला. थोडी तरी लाज बाळगा आणि कणखरपणा दाखवा.”

काही दिवसांपूर्वी आमदारांनी बंड केल्यानंतर त्यावरही महुआ मोईत्रा यांनी टीका केली होती. ममता बॅनर्जी यांच्या करिष्म्यावर हे बिनकामाचे नेते आजवर टिकून होते, अशी टीका मोईत्रा यांनी केला.

जनादेश ममता बॅनर्जींना

युसूफ पठाण यांच्यावर टीका करण्यापूर्वी मोईत्रा यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली. त्यांनी फुटीर खासदारांच्या गटाला म्हटले की, या खासदारांनी टीएमसीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तेव्हाचा जनादेश हा एनडीएला नाही तर टीएमसीला होता. सर्व लोभी, स्वार्थी नेत्यांनी आता भाजपमामध्ये जावे. आपल्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून दाखवा. बघू तुम्ही किती मोठे आहात”

माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांचीही टीका

माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार किर्ती आझाद यांनीही संभाव्य फुटीवर भाष्य केले.

आझाद यांनी एक्सवर एक यादी शेअर केली आहे. यात त्यांनी बंडखोर खासदारांची व्हायरल होणारी यादी शेअर केली. ही यादी आणि बंडाची बातमी खोटी असून भाजपाकडून ही बातमी पेरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या यादीमधील सहा खासदारांनी कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी केलेली नाही. तसेच ते कुठेही जाणार नाहीत, असे आझाद यांनी सांगितले.

आझाद पुढे म्हणाले की, काकोली घोष दस्तीदार यांनी स्वतःला पक्षाचे मुख्य प्रतोद असल्याचे भासवले. मात्र त्यांची काही काळापूर्वीच या पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यांच्याजागी खासदार कल्याण बॅनर्जी यांची मुख्य प्रतोदपदी निवड झाली होती. याबद्दल लोकसभा अध्यक्षांना मागच्या महिन्यातच माहिती दिलेली आहे.

युसूफ पठाण – ममता बॅनर्जी वाद काय आहे?

बंगालमधील आघाडीच्या दैनिकाने दिलेल्या बातमीनंतर खासदार युसूफ पठाण चर्चेत आले. ममता बॅनर्जी यांना लोकसभेत पाठविण्यासाठी युसूफ पठाण यांना बहारामपूर लोकसभेचा राजीनामा द्यावा, अशी पक्षातील नेत्यांची योजना होती. यासाठी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यामार्फत युसूफ पठाण यांची समजूत घातली जात असल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले होते.

सौरव गांगुली यांनी याबद्दल एक पत्रक काढून यातील माहिती खोटी असल्याचे म्हटले. ममता बॅनर्जी किंवा युसूफ पठाण यांच्याशी आपला संपर्क नसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर युसूफ पठाण यांनीही एक व्हिडीओ प्रसारित करत राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले.

बहारामपूर लोकसभेत मुस्लीम समाजाची लोकसंख्या ५० ते ५२ टक्के आहे. हा टीएमसीचा प्रमुख मतदार वर्ग आहे. त्यामुळे हा मतदारसंघ ममता बॅनर्जींसाठी सुरक्षित मानला जात आहे.

तृणमूल काँग्रेसमधील काही नेत्यांची नजर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहारामपूर लोकसभा मतदारसंघावर आहे. २०२४ साली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात याठिकाणी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत पठाण यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला.