एक लाखाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सरकारने विम्याची रक्कम म्हणून दिला एक रुपया

अनेक शेतकऱ्यांना अयोग्य पद्धतीने पीक विम्याची रक्कम देण्यात आल्याचा दावा

प्रातिनिधिक फोटो

मध्य प्रदेशमधील अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून अगदीच किरकोळ रक्कम सरकारकडून देण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बैतुल जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यावर तर नुकसानभरपाई म्हणून अवघा एक रुपया सरकारने जमा केला आहे. पीक विमा योजनेअंतर्गत सरकारने २२ लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिल्याचा दावा केला असला तर झालेले नुकसान आणि देण्यात आलेली रक्कम यामध्ये जमीन आस्मानाचा फरक असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

बैतुलमधील पुरणलाल या शेतकऱ्याला पिकविम्याअंतर्गत केवळ एका रुपयाची नुकसानभरपाई मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुरणलालचे अडीच एकरवरील १ लाख रुपयांचे पिक उद्धवस्त झाल्यानंतर त्याला अवघा एक रुपया सरकारने विम्याची रक्कम म्हणून दिला आहे. याच जिल्ह्यातील इतर दोन शेतकऱ्यांना ७० रुपये आणि ९२ रुपये अशी किरकोळ रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलीय. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ने दिलं आहे.

पिकविम्याची एवढ्या कमी प्रमाणात नुकसानभरपाई देण्यांसंदर्भात कृषी विभागाकडे चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती देण्यास नकार दिला. मात्र एका अधिकाऱ्याने ओळख न सांगण्याच्या अटीवर ज्या शेतकऱ्यांना २०० रुपयांपेक्षा कमी रक्कम देण्यात आली आहे अशी प्रकरणं विमा कंपनीकडे पुन्हा तपासणीसाठी पाठवली जाणार असल्याचे सांगितलं आहे. या प्रकरण कृषी विभाग विमा कंपन्यांशी चर्चा करत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

बैतुलमधील ६४ हजार ८९३ शेतकऱ्यांना ८१ कोटी ७१ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात आले आहेत. मात्र यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अगदीच किरकोळ रक्कम सरकारकडून जमा करण्यात आली आहे. त्यामुळेच आता हा विषय शेतकऱ्यांनी राज्य सरकारसमोर मांडण्याचा विचार सुरु केला आहे. अनेक शेतकऱ्यांना झालेल्या काही एकरांमधील पिकाच्या नुकसानीसाठी २०० रुपयांहून कमी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. त्यामुळेच सरकारने यासंदर्भात वेळीच योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. करोनामुळे आधीच आर्थिक फटका बसला असून त्यात अशापद्धतीची वागणूक यंत्रणांकडून दिली जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Having lost crops worth rs 1 lakh madhya pradesh farmer receives re 1 in insurance claims scsg