पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षाचा दारुण पराभव झाला. भाजपाला २०० हून अधिक जागा मिळाल्या. सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले. तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षात फाटाफूट झाली. आमदारांनी, खासदारांनी बंड केल्याचं दिसलं. ममता बॅनर्जी यांचा हा पराभवाचे परिणाम देशाच्या राजकारणावर होत आहेत असं मत विश्लेषक शैलेंद्र परांजपे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच या पराभवाचे अर्थही सांगितले आहेत.
काय म्हटलं आहे शैलेंद्र परांजपेंनी?
ममता बॅनर्जी यांचे आमदार फुटले आहेत, २० खासदार फुटले आहेत. त्याचा काय परिणाम दिसतो असं विचारलं असता शैलेंद्र परांजपे म्हणाले, “भारतीय जनता पक्ष २०१९ ला ३०० जागांच्या वर गेले. तर २०२४ ला मोदी सरकारच परत येईल, जास्त जागा येतील. पण त्यावेळी फटका बसला आणि २४० खासदार आले, त्यावेळी असं लक्षात आलं की हे सगळं वातावरण अस्थिर असतं. २००४ च्या निवडणुकांमध्ये वाजपेयी सरकारचा मोठा प्रचार झाला होता. शायनिंग इंडिया, फिल गुड फॅक्टर असं सगळं होतं. त्यावेळी ते सरकार गेलं. कुणीही विश्वास ठेवला नव्हता. कुणीही म्हटलं नव्हतं की वाजपेयी सरकार जाईल. पण तरीही ते सरकार गेलं. जनतेच्या मनातलं कळत नाही. पश्चिम बंगालमध्ये जे घडतंय त्या मागे काय आपण समजून घेऊ. ३४ वर्षे डाव्यांचं सरकार १९७७ ते २०११. ते सरकार गेलं कसं? तर लोक त्यांना कंटाळले होते पण पर्याय नव्हता. तसंच मोदींना पर्याय असं वाटलं होतं. पण २०२४ ला जागा कमी झाल्या.” असं शैलेंद्र परांजपे यांनी म्हटलं आहे. थिंक बँक या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शैलेंद्र परांजपे यांनी हे विधान केलं आहे.

पश्चिम बंगालचा विकास झालेला नाही हे वास्तव आहे-परांजपे
ममता बॅनर्जी या हरल्या आहेत म्हणून हे मी म्हणत नाही. पण पश्चिम बंगालचा विकास झालेला नाही हे तर वास्तव आहे. त्यांच्या राजकारणाला तर्कशुद्धता नाही. आत्ता त्यांना सोडताना त्यांचे आमदार आणि खासदार दबक्या आवाजात हीच चर्चा करत आहेत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की ८० पैकी ६० आमदार फुटले असले तरीही ममता बॅनर्जींची मतं कमी झालेली नाहीत. त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता सरकार गेलं आहे, पण जनाधार घटलेला नाही. विरोधकांना खिळखिळं करताना भाजपाने हे लक्षात घेतलं आहे की ममता बॅनर्जींचा जनाधार घटलेला नाही. तसंच तृणमूलचे २० खासदार फुटले आणि भाजपात विलीन झाले तर भाजपाच्या खासदारांची संख्या ही थे २६० वर पोहचेल. २६० खासदार घेऊन आपण लोकसभेला सामोरं गेलो तर जास्त फायदा होईल असं भाजपाला वाटतं आहे. महाराष्ट्रात संविधानाचा नरेटिव्ह चालला म्हणून काँग्रेसच्या जागा वाढल्या. बंगालमध्ये फुटीचा परिणाम हा विरोधक कमकुवत होण्यामध्ये होतो आहे. एकीकडे ममता बॅनर्जी आज दाती तृण घेऊन म्हणत आहेत की इंडिया आघाडी असली पाहिजे. काल पर्यंतची स्थिती ही होती की त्या थेट सोनिया गांधींना आव्हान देत होत्या. आता संजय राऊत काय म्हणू लागलेत, शरद पवार आणि ममता बॅनर्जींनी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे. कोण सांगतंय लक्षात घ्या तर संजय राऊत हे म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असाच प्रकार आहे. पश्चिम बंगालच्या आत्ताच्या घडामोडींचे परिणाम हे फक्त बंगालवर होत नाहीयेत. महाराष्ट्रात शिंदेंनाही अशीच भीती आहे, त्यामुळे त्यांनी बच्चू कडू यांना पंखाखाली घेतलं. हितेंद्र ठाकूर त्यांच्या पक्षात जातील याची चर्चा आहे.

तृणमूलचे खासदार फुटले आणि भाजपात विलीन झाले तर…
तृणमूलचे खासदार फुटले आणि भाजपात विलीन झाले तर भाजपाच्या खासदारांची संख्या २६० होते. २६० वरुन २७२ आणू शकतो हा विश्वास भाजपा निर्माण करु शकते. महाराष्ट्रात आत्ता लोकसभेची चिंता नाही. संविधानाच्या नरेटिव्हमुळे भाजपा २३ वरुन ९ वरुन आले आहेत. पण २०२९ ला भाजपा नऊ खासदारांवर राहिल का? तर नक्कीच नाही. त्यामुळे भीती ती नाहीच. मग भीती कसली आहे महाराष्ट्रात? २०१४ ते २०१९ हे सरकार देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं चालवलं. आजही ते सरकार चालवत आहेत त्यांना इन्फ्रा मॅन म्हटलं जातं आहे. तरीही २०१९ मध्ये काँग्रेससह गेले आणि मुख्यमंत्री झाले की नाही? तर झाले. हा प्रयोग पुन्हा होऊ शकतो का तर होय शक्यता आहेच. आजही भाजपाला म्हणजेच १३२ वाल्यांना एकटं पाडून इतरांचं सरकार आजही होऊ शकतं कारण आकडे सरकार आणण्यासाठी लागतातच. स्वतःचे १४५ आमदार आणण्याची ताकद आज भाजपाकडे आहे का? तर नाही. म्हणूनच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार सत्तेत आहेत. ज्या क्षणी त्यांचे १४५ आमदार होतील तेव्हा या कुबड्या काढल्या जातील, खुद्द अमित शाह यांनीच हे संकेत दिलेत. भाजपाला आजही खात्री नाही की आपण आपल्या जिवावर १४५ आमदार महाराष्ट्रात आणू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपा त्यांच्या पार्टनर्सना आज फसवणार नाही. एकनाथ शिंदे किंवा सुनेत्रा पवार दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना रहाव्यात ही भाजपाची जास्त गरज आहे. देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेते आहेत असं आपण म्हटलं आहे. त्यांची पवारांची तुलनाही झाली. पण फडणवीस दिल्लीत गेले तर पुढे काय? पुढे भाजपाकडे नेतृत्व नाही. त्यामुळे राज्यात शिंदे आणि पवारांना कुणीही अजिबात फसवणार नाही. शिवाय विधानसभेला १३२ वरुन खाली जाऊ शकतात ना हे लक्षात घेतलं पाहिजे असंही शैलेंद्र परांजपे यांनी म्हटलं आहे.
