Hawaii Holei Sea Arch Collapse : अमेरिकेतील हवाईमधील प्रसिद्ध ‘होलेई सी आर्च’ अखेर प्रशांत महासागरात कोसळला आहे. तब्बल ५०० वर्षांहून अधिक काळ नैसर्गिकरित्या उभी असलेली ही विशाल दगडी कमान ‘हवाई व्होल्केनोझ नॅशनल पार्क’च्या दक्षिण किनाऱ्यावर होती. ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’ने या घटनेची माहिती दिली आहे. समुद्राच्या लाटांमुळे शतकानुशतके सुरू असलेल्या नैसर्गिक धूप प्रक्रियेमुळे ही कमान हळूहळू कमकुवत होत गेली आणि अखेरीस कोसळली. या घटनेनंतर कमान कोसळण्यापूर्वीचे आणि नंतरचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे
२७ मीटर उंच होती नैसर्गिक कमान
‘होलेई सी आर्च’ हवाईच्या ‘बिग आयलंड’च्या दक्षिण किनाऱ्यावर ‘हवाई व्होल्केनोझ नॅशनल पार्क’मध्ये स्थित होती. ही नैसर्गिक दगडी कमान सुमारे ९० फूट म्हणजेच २७ मीटर उंच होती. ज्वालामुखीय खडकांच्या नैसर्गिक रचनेतून निर्माण झालेल्या या कमानीला समुद्राच्या लाटा आणि वाऱ्यामुळे हजारो वर्षांपासून आकार मिळत गेला होता.
२३ सप्टेंबरला उभी, २७ सप्टेंबरपर्यंत गायब
‘नॅशनल पार्क सर्व्हिस’च्या माहितीनुसार, २३ सप्टेंबरपर्यंत ‘होलेई सी आर्च’ उभी होती, मात्र २७ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत ती पूर्णपणे कोसळली होती. ती नेमकी कोणत्या वेळी कोसळली, हे निश्चितपणे समोर आलेले नाही. मात्र त्या काळात उष्णकटिबंधीय वादळ ‘नोलो’मुळे पार्क काही काळ बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पार्क बंद असतानाच कमान कोसळली असण्याची शक्यता ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’ने व्यक्त केली आहे.
समुद्राच्या लाटांनी हळूहळू केला खडक कमकुवत
ही घटना अचानक घडलेली नसून शतकानुशतके सुरू असलेल्या नैसर्गिक प्रक्रियेचा परिणाम असल्याचे ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’ने स्पष्ट केले आहे. समुद्राच्या शक्तिशाली लाटा सातत्याने किनाऱ्यावरील खडकावर आदळत होत्या. खडकाच्या काही मऊ थरांची झीज कठीण थरांच्या तुलनेत वेगाने झाली. या प्रक्रियेला विभेदनी धूप म्हटले जाते. हळूहळू खडकाचा आधार कमी होत गेला आणि कमानीची रचना अधिकाधिक नाजूक बनत गेली. अखेरीस तिचा तोल गेला आणि ती समुद्रात कोसळली.
कमान कोसळणार असल्याचा इशारा आधीपासूनच
‘नॅशनल पार्क सर्व्हिस’ने या नैसर्गिक रचनेच्या भवितव्याबाबत आधीपासूनच इशारा दिला होता. समुद्राची धूप सुरूच राहणार असल्याने ही कमान एक दिवस समुद्रात कोसळणार हे नैसर्गिक प्रक्रियेचा भाग मानले जात होते. मात्र ती नेमकी किती वर्षे किंवा किती दशके टिकेल, याचा अंदाज लावता येत नव्हता. किनाऱ्याची धूप पुढेही सुरू राहणार असून भविष्यात त्याच प्रक्रियेतून नवीन नैसर्गिक रचना तयार होऊ शकतात, असे ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’ने म्हटले आहे.
पर्यटकांना धोकादायक भागापासून दूर राहण्याचा इशारा
कमान कोसळल्यानंतरही तिच्या आसपासचा किनारा पर्यटकांसाठी धोकादायक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. समुद्राकडे उभे असलेले किनारी कडे अस्थिर असून ते अचानक कोसळण्याचा धोका आहे. कमान कोसळलेल्या भागात काही जण सोशल मीडियासाठी फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसल्याने ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’ने पर्यटकांना विशेष इशारा दिला आहे.
अस्थिर कड्यांच्या अगदी जवळ जाणे जीवघेणे ठरू शकते. समुद्राच्या जोरदार लाटा आणि उंच कड्यांमुळे एखादी व्यक्ती खाली पडल्यास बुडण्याचा धोका असून, अशा परिस्थितीत बचावासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांनी बंद करण्यात आलेल्या भागात प्रवेश करू नये आणि किनाऱ्यावरील अस्थिर कड्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’ने केले आहे.
