Jharkhand Superstition Human Sacrifice Case: झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील विष्णूगढ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील कुसुंभा गावात एक संतापजनक प्रकार घडला आहे. महाराष्ट्रात भोंदू अशोक खरातचे प्रकरण गाजत असताना इतर ठिकाणीही अंधश्रद्धेशी निगडित धक्कादायक घटना घडत असल्याचे समोर आले आहे. या गावातील एका आईने स्वतःच्याच १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा नरबळी दिला आहे. पोलिसांनी याचा उलगडा केला असून मुलाची प्रकृती सुधारावी म्हणून आईने मांत्रिकाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
१३ वर्षीय मुलीची हत्या
सदर घटना २४ मार्च रोजी रात्री घडली. रात्री रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान अल्पवयीन मुलगी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील शाळेमागे असलेल्या बांबूच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला. मुलीची आई रेशमा देवी हिनेच मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी धानेश्वर पासवान आणि इतरांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. मात्र चौकशीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि धक्कादायक सत्य समोर आले.
झारखंडचे पोलीस महासंचालक आणि हजारीबाग पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानंतर २६ मार्च रोजी एसआयटी स्थापन करण्यात आली. तांत्रिक बाबींचा तपास आणि स्थानिकांची चौकशी केल्यानंतर जे सत्य समोर आले, त्याने सर्वांनाच धक्का बसला. गावातील मांत्रिक शांती देवी हीने रेशमा देवीच्या मुलाची प्रकृती बरी व्हावी, यासाठी बळी देण्याचा पर्याय सुचवला. स्वतःच्या मुलीचा नरबळी देण्यासाठी मांत्रिक महिलेने रेशमा देवीला तयार केले.

मुलाची प्रकृती बरी करायची असेल तर कुमारिकेचा बळी द्यावा लागेल, असे ५५ वर्षीय शांती देवीने मुलीच्या आईला सांगितले. पोलिसांनी सांगितले की, रेशमा देवी तीन महिन्यांपासून संबंधित मांत्रिक महिलेच्या संपर्कात होती. रामनवमीच्या काळात येणाऱ्या दुर्गाष्टमीला नरबळीचा विधी करण्यास शांती देवीने सांगितले होते.
घटनेच्या रात्री, रेशमा देवीने तिचा प्रियकर भीम राम (४०) याच्यासह मुलीला पूजेच्या बहाण्याने मांत्रिकाच्या घरी नेले. विधी पार पडल्यानंतर मुलीला बांबूच्या शेतात नेऊन तिचा गळा दाबण्यात आला. मुलगी प्रतिकार करत असताना आईने तिचे पाय पकडून धरले होते. मृत्यूनंतर मुलीच्या देहाची विटंबना करण्यात आल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
