न्यायालयाची उन्हाळी सुटी रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका बुधवारी फेटाळण्यात आली. सुटीच्या काळातही न्यायाधीश दिवसातील ठरावीक काळ निकालपत्र लिहिण्यातच घालवतात, असे याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रकाश इंडिया संघटनेने दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश बी. डी. अहमद आणि न्या. विभू बाखरू यांच्या खंडपीठाने फेटाळली. उच्च न्यायालयाचा कारभार कसा चालतो, याची याचिकाकर्त्यांना पुरेशी माहिती नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. सुटीच्या काळातही बहुतेक न्यायाधीश दिवसातील ठरावीक वेळ निकालपत्र लिहिण्यासाठी कार्यालयात येत असतात, याकडे न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे लक्ष वेधले.
न्यायाधीशांना पोलिसांप्रमाणे आळीपाळीने सुटी देण्यात यावी किंवा सुटीचा कालावधी ३० दिवसांवरून १० ते १५ दिवस करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. ती न्यायालयाने फेटाळली.

Story img Loader