Donald Trump Lauds PM Narendra Modi At Davos: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘जवळचा मित्र’ आणि ‘उत्तम व्यक्ती’ अशा शब्दात ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. उभय देशांमध्ये लवकरच व्यापार करार होईल असा आत्मविश्वास देखील ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला. वार्षिक आर्थिक परिषद, दावोस येथे ट्रम्प बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती मला आदर – डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी मनीकंट्रोलशी साधलेल्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध आणि दोन्ही देशांमधील व्यापार करारावर भाष्य केले. “तुमच्या पंतप्रधानांप्रती मला खूप आदर आहे. ते उत्तम व्यक्ती असून माझे जवळचे मित्र आहेत. लवकरच आम्ही मोठा करार करु”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका टाळली

ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे अमेरिका आणि भारतातील व्यापारावर परिणाम झाला आहे. व्यापार पूर्ववत करण्यासाठी उभय देशांमध्ये वाटाघाटी सुरु आहेत. दरम्यान, दावोस, स्वित्झरर्लंडमध्ये सुरु असलेल्या वार्षिक आर्थिक परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींवर थेट टीका करण्यास टाळले आहे. उलट भारत आणि भारतीय नेतृत्वाबाबत त्यांनी सकारात्मक भाष्य करताना वैयक्तिक संबंध अधोरेखित केले आहेत.

मोदींच्या मृदू आणि कठोर स्वभावाचे कौतुक

डोनाल्ड ट्रम्प माध्यमांशी संवाद साधताना मोदींचे जाहीर कौतुक करताना दिसले. मोदींच्या मृदू आणि त्याचवेळी कठोर स्वभावाचा उल्लेख ट्रम्प यांनी केला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये देखील मोदींच्या स्वभावाच्या दोन्ही पैलूंचा उल्लेख ट्रम्प यांनी केला होता. मोदींच्या नेतृत्व गुणांचे विशेष कौतुक त्यांनी केले होते. वैश्विक स्तरावर व्यापारापलीकडे मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक ट्रम्प यांनी केले होते. जागतिक पातळीवर भारताचा आदर केला जाऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय नेते मंडळी मोदींचे ऐकू लागले आहेत, असेही ट्रम्प म्हणाले.

५० टक्के टॅरिफचा फटका

भारत – अमेरिकेतील व्यापारी संबंध ताणले असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भाष्य करताना पॉलिसी केंद्रस्थानी ठेवत व्यक्तिगत टीका टाळल्याचे दिसून आले. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. दरम्यान, अलिकडेच पदभार स्विकारलेल्या भारतातील अमेरिकन राजदूत सरजिओ गोर यांनी दोन्ही देशातील संबंधावर सकारात्मक भाष्य केले आहे. व्यापारामुळे दोन्ही देशांत ताणलेले संबंध पूर्ववत होतील, असा विश्वास गोर यांनी व्यक्त केला आहे.