२८ वर्षीय बँक मॅनेजरने एका सहा वर्षांच्या मुलाची हत्या केली. या तरुणाने सहा वर्षांच्या मुलाचा गळा चिरला आणि त्याची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बँक मॅनेजरचं काम अर्पित पराशर असं आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. अर्पितला सहा वर्षांच्या मुलाच्या आईशी लग्न करायचं होतं त्यामुळे त्याने तिच्या मुलाला ठार केलं. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठची आहे. अर्पित हा एका खासगी बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होता.

नेमकी घटना काय?

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्पित पराशरची या प्रकरणी जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली, उडवाउडवीची उत्तरं देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याने सांगितलं की त्यानेच या सहा वर्षांच्या मुलाची हत्या केली आणि मुलाचा मृतदेह त्याने कॅनॉलमध्ये फेकला. अभिजीत कुमार पुढे म्हणाले या प्रकरणी आम्ही सहा वर्षांच्या मुलाची आई गुरुप्रीतलाही विचारणा केली, मात्र तिला मुलाची हत्या झाली आहे हे ठाऊक नाही असं तिने सांगितलं. अंगदवीर असं या मुलाचं नाव होतं. त्याचे वडील गुरुसेवक हे दुबईमध्ये ट्रक चालक म्हणून काम करतात. अंगदवीर हा त्याच्या आईसह मेरठमध्ये राहात होता.

पोलिसांनी काय सांगितल?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अर्पित गुरुप्रीतला मागील तीन वर्षांपासून ओळख होता. बँकेच्या कामानिमित्त या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर त्याला वाटलं की आपण गुरुप्रीतशी लग्न करावं. अर्पित म्हणाला मला गुरुप्रीतशी लग्न करायचं होतं. आमच्या प्रेमसंबंधात अंगदवीर अडथळा ठरला असता, त्यामुळे त्याच्या अपहरणाचा कट मी रचला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंगदवीर त्याच्या घराच्या बाहेर खेळत होता, अचानक बेपत्ता झाला. काही तास उलटले तरीही तो परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला प्रचंड चिंता वाटू लागली. अंगदवीरची आजी बलविंदर कौर यांनी आमच्या नातवाचं अपहरण झालं आहे अशी तक्रार नोंदवली. तसंच त्यांनी संशयित म्हणून अर्पित पराशरचं नाव घेतलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हे कळलं की जिथे अंगदवीर खेळत होता तिथे एक पांढऱ्या रंगाची कार येऊ थांबली, अंगदवीर त्या कारमध्ये जाऊन बसला. त्याने कुठलेही आढवेढे घेतले नाहीत. त्यामुळे कारमध्ये बसलेली व्यक्ती त्याच्या ओळखीची होती हे उघड आहे हा अंदाज पोलिसांना बांधला, ज्यानंतर त्या अनुषंगाने तपास करण्यात आला आणि अर्पितला अटक करण्यात आली. कारण पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमुळे मोठा पुरावा हाती आला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

अर्पितने आधी टाळाटाळ केली त्यानंतर गुन्हा कबूल केला

अर्पित पराशरला आधी ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या चौकशी दरम्यान जे कठोर आणि उलटसुलट प्रश्न विचारण्यात आले त्यानंतर अर्पिने गुन्हा मान्य केला. त्याने हे सांगितलं की आधी त्याने अंगदवीरला त्याच्या घराच्या बाहेरुन बरोबर घेतलं, आधी त्याचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्याची हत्या केली. पोलिसांनी अंगदवीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.