युक्रेनमध्ये व्यापारी जहाजावर रशियाने केलेल्या हल्ल्यात चार भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, एक भारतीय नागरिक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. यातील एका मृत भारतीयाची ओळख पटली आहे. अखिल जोयान असं त्याचं नाव असून तो केरळमधल्या वेल्लारीकुंडू गावातील रहिवासी होता. मागील सहा वर्षांपासून तो या जहाजावर काम करत होता. अखिलचं लग्न होणार होतं. पण त्याआधीच त्याच्या मृत्यूची बातमी आली. त्यामुळे त्याचं कुटुंब शोकसागरात बुडालं आहे.
अखिलच्या कुटुंबाने काय सांगितलं?
अखिल हा युक्रेनच्या व्यापारी जहाजावर काम करत होता. त्याने चेन्नईतून मरिनर होण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. ज्यानंतर तो मागील सहा वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत होता. मागच्या महिन्यात तो केरळला आला होता. त्याने ठरवलं होतं की युक्रेनमधली ही नोकरी सोडायची आणि दुसरीकडे नोकरी बघायची. ३० सेकंदांत जास्तीत जास्त पूल अप्स मारण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावे होता. मागच्या महिन्यात तो घरी आला तेव्हाच त्याचं लग्नही ठरलं होतं. पण काळाला हे मंजूर नसावं. कारण युक्रेनवर रशियाने जो हल्ला केला त्यात आमचा अखिल मारला गेला असं त्याच्या कुटुंबाने सांगितलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केला हल्ल्याचा निषेध
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने व्यापारी जहाजावरील निषेध केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईमधील ओशियन ग्रेस शिपिंग लिमिटेड या कंपनीच्या एमव्ही गोल्डन लिओ जहाजावर हल्ला झाला आहे. युक्रेनियन नौदलाच्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या जहाजावर रशियाने तीन क्षेपणास्त्र डागली. या जहाजावर भारत आणि सिरियातील खलाशी काम करत होते. १९ जुलै रात्रीच्या सुमारास जहाज ओडेसा बंदरातून बाहेर पडताना हा हल्ला झाला, अशी माहिती समोर आली आहे.
चार भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू
एमव्ही गोल्डन लिओ या जहाजावर एकूण १७ कर्मचारी होते, ज्यामध्ये ५ भारतीय नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. युक्रेनमधील भारतीय दुतावास जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून, मदत पुरवली जात आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.
