जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूमुळे काळजीत वाढ झालीय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या विषाणूविषयी अनेक प्रश्न पडत आहेत. या विषाणुमुळे करोनाची तिसरी लाट येणार का, आधीची लस या विषाणूचा सामना करू शकणार का, यापासून बचावासाठी काय करावं हे आणि असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. अशाच ५ प्रश्नांचं शंकासमाधान केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केलं आहे. त्याचा हा आढावा.

१. ओमायक्रॉनच्या आगमनामुळे भारतात करोनाची तिसरी लाट येईल का?

आरोग्य मंत्रालयाने सांगितलं, “ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये जगभरात वाढ होत आहे. यात दक्षिण अफ्रिकेबाहेरील देशांचाही समावेश आहे. त्यामुळे भारतासह इतर देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी अद्याप या विषाणूच्या संसर्गाचा दर आणि त्याचा धोका स्पष्ट झालेला नाही. भारतात करोना विरोधी लसीकरणही वेगात होत आहे. त्यामुळे या विषाणूचा धोकाही काही प्रमाणात कमी होईल. मात्र, त्याबाब अजून वैज्ञानिक तथ्य समोर येत आहेत.”

२. सध्या अस्तित्वात असलेली करोना लस ओमायक्रॉनचा सामना करु शकेल का?

“सध्याची करोना विरोधी लस ओमायक्रॉनचा सामना करू शकणार नाही असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. या विषाणूच्या स्पाईकवरील काही बदल हे लसीची परिणामकारकता काही प्रमाणात कमी करू शकतात. असं असलं तरी लसीची सुरक्षा प्रतिजीव आणि पेशींची रोगप्रतिकारकता यावर आहे. त्यामुळे ही रोगप्रतिकारकता सुरक्षित राहील. त्यामुळेच या लसी गंभीर आजारांसाठी सुरक्षा देईन. त्यामुळे पात्र असलेल्या सर्वांनी लस घ्यावी.”

३. ओमायक्रॉन विषाणूबाबत काळजी कशी घ्यावी?

आरोग्य मंत्रालयाने या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं, “विषाणूच्या रचनेतील बदल, संसर्गाचा अधिक वेग आणि रोग प्रतिकारक शक्तीला भेदण्याची शक्यता या निकषांवर ओमायक्रॉन ‘व्हायरस ऑफ कन्सर्न’ म्हणून घोषित आहे. यामुळे करोना होऊन गेलेल्या लोकांनाही पुन्हा करोना होऊ शकतो. असं असलं तरी या विषाणूबाबतचे अधिक तपशील येणे बाकी आहे.”

हेही वाचा : ओमायक्रॉन व्हेरिएंट खरंच किती धोकादायक? द. अफ्रिकेतीत तज्ज्ञ म्हणतात, “डेल्टाच्या तुलनेत…!”

४. ओमायक्रॉन विषाणूबाबत काळजी कशी घ्यावी?

“ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकाने मास्कचा वापर करणं अत्यावश्यक आहे. याशिवाय करोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घ्या. शारीरिक अंतराच्या नियमाचं पालन करा आणि शक्य तितक्या मोकळ्या हवेशीर ठिकाणी थांबा,” असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलाय.

५. सध्या वापरात असलेली पद्धत ओमायक्रॉन विषाणू संसर्ग आहे की नाही हे शोधू शकते का?

आरोग्य मंत्रालयाने सांगितलं, “सध्या वापरात असलेल्या करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीत (RTPCR Corona Test) ओमायक्रॉन विषाणूचे काही जीन्स सापडतात. यात स्पाईक्स, एनव्हलप, न्युक्लिओप्सिड यांचा समावेश आहे. असं असलं तरी ओमायक्रॉनमधील एस जीनच्या रचनेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्यानं त्याचा शोध सध्याच्या चाचण्यांमध्ये लावता येत नाही. त्यामुळे अशा चाचण्यांमध्ये एस जीन नसल्याचं दर्शवलं जाऊ शकतं. त्यामुळे या एस जीनचा वापर ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी होऊ शकतो. मात्र, त्यासाठी ओमायक्रॉनच्या ‘जेनेटिक जिनोमिक सेक्वेन्सिंग’ समजणं गरजेचं आहे.”