ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात वेळ मागितला, त्यावर न्यायालयाने उद्या दुपारी ३ वाजता सुनावणी निश्चित केली आहे. यावेळी सर्व पक्षांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. गुरुवारी या खटल्याची सुनावणी सुरू झाली तेव्हा हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांचे सहकारी ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची उद्या सुनावणी करावी. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दुपारी ३ वाजता पुढील सुनावणीची वेळ निश्चित केली आहे.

यासोबतच वाराणसी न्यायालयातील सुनावणीलाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल वाराणसी न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालात सापडलेल्या पुराव्यांबाबत अनेक प्रकारचे अटकळ बांधले जात असले तरी त्यावर कोणताही खुलासा करण्यास न्यायालयाच्या आयुक्तांनी नकार दिला आहे. न्यायालयाचा आढावा घेतल्यानंतरच याबाबत कोणताही खुलासा करता येईल, असे न्यायालयाचे आयुक्त विशाल कुमार सिंह यांनी सांगितले.

याआधी ज्ञानवापी-शृंगार गौरी संकुलात सर्वेक्षणादरम्यान कथितरीत्या शिवलिंग सापडलेला भाग संरक्षित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या मशिदीत मुस्लीम कोणत्याही अडथळय़ाविना नमाज अदा करू शकतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीने सर्वेक्षणाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. ज्ञानवापी-शृंगार गौरी संकुलाचे चित्रीकरणाद्वारे करण्यात आलेले सर्वेक्षण हे प्रार्थनास्थळ कायदा १९९१ मधील तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. दुसरीकडे, हिंदू सेनेने या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करून मशीद व्यवस्थापन समितीची याचिका फेटाळण्याची मागणी केली होती.

ज्ञानवापी-शृंगार गौरी संकुलाच्या सर्वेक्षणाबाबत वाराणसी न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वेक्षणादरम्यान कथितरीत्या शिवलिंग सापडलेला भाग संरक्षित करण्याचे निर्देश न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र, मशिदीत मुस्लिमांना नमाज अदा करता येईल, त्यात त्यांना कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होत. त्यानंतर आज या प्रकरणाची सुनावणी होणार होती.