जयपूर : सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसच्या १९ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या नोटीशीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज, सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
पायलट यांची आव्हान याचिका दाखल करून घेताना उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील कारवाईला मंगळवापर्यंत स्थगिती दिली होती. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होत असल्याने उच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या १९ आमदारांच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अल्पमतात आल्याचा दावा पायलट यांनी केला होता. पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना स्वगृही आणण्याचे काँग्रेसच्या नेतृत्वाचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर गेहलोत यांच्या समर्थक आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गेहलोत सरकार पाडण्याच्या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा सहभाग असल्याचा आरोप करीत काँग्रेसनेते अजय माकन यांनी, शेखावत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
