पीटीआय, लंडन
दक्षिण भारतातील पितृसत्ताक जीवनशैलीमध्ये वावरताना स्त्रियांमध्ये असलेली परिवर्तनशीलता, त्यांनी केलेला प्रतिकार, चातुर्य आणि भगिनीभाव याभोवती फिरणाऱ्या कथांचा संग्रह असलेल्या ‘हृदय दीप’ या पुस्तकाच्या अनुवादास यंदाचा ‘इंटरनॅशनल बुकर पुरस्कार’ मिळाला. कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्या या कथासंग्रहाचा दीपा भस्ती यांनी ‘हार्ट लॅम्प’ या नावाने अनुवाद केला आहे.
साहित्य क्षेत्रात मानाच्या ‘बुकर’वर नाव कोरणाऱ्या मुश्ताक या पहिल्या कन्नड लेखिका ठरल्या आहेत. लंडनमधील टेट मॉडर्न येथे मंगळवारी रात्री झालेल्या सोहळ्यामध्ये मुश्ताक यांनी भस्ती यांच्यासह पुरस्कार स्वीकारला. ५० हजार पौंड (सुमारे ५७ लाख ५० हजार रुपये) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार म्हणजे विविधतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया बानू मुश्ताक यांनी व्यक्त केली. तर या सुंदर भाषेचा हा विजय आहे, अशी भावना भस्ती यांनी बोलून दाखविली. केली. ‘हृदय दीप’मध्ये १९९० ते २०२३ अशा सुमारे ३० वर्षांच्या दीर्घ कालावधीत लिहिलेल्या १२ कथा आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुश्ताक यांचे अभिनंदन केले असून त्यांनी कन्नड भाषेचा ध्वज आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकविल्याची प्रतिक्रिया नोंदविली.
अनुभवांच्या चित्रमालिकेत प्रत्येक अनुभव मोलाचा असतो या विश्वासातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्याला विभागणाऱ्या जगामध्ये साहित्य हे हरवलेले पवित्र अवकाश आहे. त्यामध्ये आपण काही पानांमधून का होईना, एकमेकांच्या मनात डोकावू शकतो.– बानू मुश्ताक