कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली आहे. त्यानुसार त्यांची मालमत्ता त्यांच्या पत्नी शिल्पा शेट्टर यांच्या तुलनेत चार पटींनी वाढली असली तरी पत्नी शिल्पा व बंधू प्रदीप शेट्टर यांच्याकडून घेतलेल्या कर्जाचे मोठे ओझे त्यांच्या शिरावर आहे.
शेट्टर हुबळी मतदारसंघातून चारदा विजयी झाले असून यंदा ते लागोपाठ पाचव्यांदा उभे आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्यावर १८.९७ लाख रूपयांचे कर्ज आहे. त्यातील ७.५१ लाख रूपये ते कुटुंबीयांना देणे लागतात, तर ४.५ लाख रूपये बंधू प्रदीप शेट्टर यांना देणे लागतात. त्यांनी पत्नीकडून ६.९६ लाख रूपये कर्ज घेतले होते. शेट्टर यांच्या मालमत्तेची किंमत चार पटींनी वाढली आहे, तर त्यांच्या पत्नीची मालमत्ता पाच वर्षांत दुप्पट झाली आहे. शेट्टर यांची मालमत्ता २००८ मध्ये ९९.४२ लाख होती ती आता ४.४४ कोटी झाली आहे. त्यांच्या पत्नीची मालमत्ता २००८ मध्ये २१.०६ लाख होती ती आता ४३.१८ लाख झाली आहे. त्यांच्याकडे २००८ मध्ये ७८ लाखांची स्थावर मालमत्ता होती ती आता ३.६४ कोटी रूपयांची आहे. त्यांच्या कुटुंबाकडे वाहन नाही. २००८ मध्ये त्यांच्याकडे १३१० ग्रॅम सोने होते ते तेवढेच आहे. मुख्यमंत्र्यांची छावरगुडा येथे तीन एकर, केशवपूर येथे १३८३ चौरस फूट व बंगलोरमध्ये आर.टी.नगर येथे ३९९१ चौरस फूट जागा आहे. त्यांची दोन घरे आहेत; त्यांचे क्षेत्र ११, ७८० चौरस फूट आहे. हुबळीतील या घरांची किंमत एक कोटी रूपये आहे. इतर मालमत्ता २००८ मध्ये २०.६४ लाख होती ती आता ८०.४७ लाख झाली आहे. शेट्टर यांनी २०११-१२ मध्ये प्राप्तिकर विवरण पत्र भरले आहे त्यात उत्पन्न २.६४ लाख दाखवले आहे. त्यांच्या पत्नी शिल्पा यांनी २००६-०७ मध्ये प्राप्तिकर विवरणपत्र भरले होते त्यात त्यांचे उत्पन्न १.४६ लाख दाखवले आहे.