पीटीआय, नवी दिल्ली : देशभरात उशिरा पोहोचलेल्या पावसाने गुरुवारी बरेच नुकसान झाले. दिवसभरात विविध राज्यांतील अनेक लहान-मोठी शहरे आणि गावांमध्ये रस्ते पाण्याखाली जाणे, झाडे उन्मळून पडणे, मालमत्तांचे नुकसान आणि सामान्य जनजीवन विस्कळीत होणे यासारख्या घटना घडल्या. परिस्थिती सामान्य करण्यासाठी ठिकठिकाणी प्रशासनाला धडपड करावी लागत आहे.
गुजरातमधील सूरतसारख्या अनेक शहरांमध्ये रस्ते आणि निवासी भाग अजूनही पाण्याखाली आहेत. जीवावर उदार होऊन गुडघाभर अस्वच्छ, तुंबलेल्या पाण्यातून वाट काढणारे लोक, वाहने आणि रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी यांच्या जोडीला जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून वाहनांचे नुकसान होणे आणि रस्ते अडणे असे चित्र वेगवेगळ्या राज्यांत पाहायला मिळाले. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे आतील सामानाचे आणि घराचेही नुकसान झाले.
दिल्लीमध्ये या पावसाळ्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. हवामान विभागाने गुरुवारी दिवसभर ‘रेड ॲलर्ट’ जारी केला. सफदरजंग भागात २४ तासांमध्ये ७२.६ मिमी आणि खजुरीमधील तुखमिरपूर येथे १६० मिमी असा सर्वोच्च पाऊस नोंदवला गेला. राजस्थानातही पाऊस पोहोचला असून कोटा आणि भरतपूर विभागामध्ये अतिशय मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चित्तोडगडमधील बडेसर आणि निम्बाहेरा, तसेच भरतपूरमधील बयाना येथे ९० मिमी पावसाची नोंद झाली. हरियाणा आणि पंजाबमध्येही पाऊस पोहोचल्यामुळे आता संपूर्ण देश मोसमी पावसाने व्यापला आहे.
उत्तराखंडच्या सात जिल्ह्यांमध्ये ‘रेड ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसामुळे भूस्खलन होऊन १०७ ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. राज्यातील गंगा, यमुना या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांची पातळी उंचावली आहे. डेहराडूनसह चार जिल्ह्यांमध्ये पहिली ते बारावीचे वर्ग बंद ठेवण्यात आले. हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे १०० फुटी लोखंडाचा पूल पाण्याखाली गेला असून लिप्पा गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भूस्खलनात आतापर्यंत सहा बळी
वायनाड : वायनाडच्या भूस्खलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सहा झाली आहे. गुरुवारी दुर्घटनास्थळी ढिगाऱ्यातून आणखी तीन मृतदेह सापडले. तिन्ही मृतदेह स्थलांतरित कर्मचाऱ्यांचे असून त्यांची ओळख पटली आहे.
