पीटीआय, नवी दिल्ली : मोसमी पावसाने सोमवारी देशभरात अनेक ठिकाणी रौद्र स्वरूप धारण केले. भूस्खलन, अचानक आलेले पूर यामुळे अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. हिमाचल प्रदेशातील चंबा येथे एका १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अनेक भागांमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. तसेच ओडिशामध्ये काही गावे बुडाली. हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
ओडिशामध्ये सलग तिसऱ्या दिवशी संततधार होत असल्याने संपूर्ण राज्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कटक, कांधामल, संबलपूर, सोनेपूर, बारगढ येथील जिल्ह्यांमध्ये अनेक शाळा आणि महाविद्यालये बंद राहिली. या राज्यांमध्ये पाणी साठणे, रस्ते व पुलांचे नुकसान होणे आणि झाडे उन्मळून पडणे यासारख्या अनेक घटना नोंदवल्या गेल्या. राज्यात अनेक ठिकाणी २४ तासांच्या कालावधीत २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. सोनेपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३२८.४ मिमी पाऊस झाला. याच जिल्ह्यातील उलुंडा येथे २९० मिमी पावसाची नोंद झाली. ओडिशातील मच्छिमारांना ७ जुलैपर्यंत बंगालच्या उपसागरात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशात रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यामुळे चंबा आणि कुलू जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याच्या घटना घडल्या आणि महत्त्वाचे रस्ते बंद पडले. हिमाचल प्रदेशातील पर्बती विद्युत केंद्र-३च्या राखीव साठ्यातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पाणी सैंज नदीमध्ये सोडण्याचे आदेश दिले. मंडी येथील जोगिंदरनगर येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे ९७ मिमी पाऊस पडला. त्यापाठोपाठ कांगडा येथे ७४.८ मिमी पाऊस झाला. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी कांगडा, उना आणि सिरमुर जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून कांगडा, मंडी, सिमला आणि सोलन जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज ॲलर्ट’ जारी केला आहे.
राजस्थान, दिल्ली या राज्यांमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसामुळे शिवनाथ आणि खारुन यासारख्या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. हवामान विभागाने मंगळवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
दोडा-किश्तवाड रस्ता बंद
जम्मूमध्ये रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पूर येऊन दोडा-किश्तवाड महामार्गाचे नुकसान झाले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. तसेच, दोडा आणि किश्तवाड जिल्ह्यांमध्ये बांधकाम सुरू असलेल्या ५४० मेगावॅट क्षमतेच्या क्वार जलविद्युत प्रकल्पाजवळ पुराचे पाणी, चिखल आणि दगड यांचा ढिगारा निर्माण होऊन अनेक वाहने गाडली गेली. मात्र, यामध्ये कोणालाही इजा झाली नाही किंवा जीवितहानी झाली नाही
