गेल्या आठवड्यात केरळच्या दक्षिण आणि मध्य भागात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि अनेक नद्यांना पूर आला आहे. तर, काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसेच जिवीतहानी देखील झाली. केरळमधील पूरपरिस्थिती आटोक्यात येत असताना आता उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. याच पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बातचीत केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.

“पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि मंत्री अजय भट्ट यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला,” असे सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले. दरम्यान, राज्यात मुसळधार पाऊस आणि पुर-परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमित सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तत्पूर्वी, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. ते राज्याच्या सचिवालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील विभक्त ठिकाणी अतिवृष्टीसह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून बद्रीनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे आणि बद्रीनाथकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे.