पश्चिम जपानमध्ये दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे २७ जण ठार झाले असून, त्यात इतर १० जण बेपत्ता आहेत असे सरकारने बुधवारी सांगितले.
या दरडी कोसळण्याने डझनावर मातीची घरे कोसळली. हिरोशिमाच्या पर्वतीय भागात ही घटना घडली असून मदतकार्य वेगाने चालू आहे. राष्ट्रीय पोलीस संस्थेने दिलेल्या माहितीनुसार एकूण २७ जण मरण पावले असून १० जण बेपत्ता झाले आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन दलाचे जवान तेथे काम करीत आहेत. अगोदर मृतांची संख्या सहा होती ती नंतर एकदम वाढत गेली. नेमक्या किती लोकांनी या घटनेत प्राण गमावले असतील याचा अंदाज सांगता येत नाही. अनेक ठिकाणी लोक जिवंत गाडले गेले आहेत. शिवाय नेमके किती लोक बेपत्ता आहेत याचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही.
५३ वर्षांच्या एका  व्यक्तीने पाच जणांना वाचवले, पण नंतर त्याच्यावरच दरड कोसळून तो मरण पावला असे अग्निशमन व व्यवस्थापन संस्थेने सांगितले. अनेक घरांच्या लाकडी चौकटी चिखलाच्या वजनाने कोसळल्या.
डोंगरातून मातीमिश्रित पाणी वेगाने वाहात आल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. आपत्कालीन व्यवस्था कर्मचारी पडलेल्या घरांच्या छपरावर काही लोकांना वाचवण्याच्या निमित्ताने चढले होते. छायाचित्रांवरून मिळालेल्या माहितीनुसार झाडे व पाच दरडी कोसळल्या आहेत.