जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग वाहून गेला, वाहतूक ठप्प

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महत्त्वाच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा १५० फूट भाग पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, रामबन आणि उधमपूर जिल्ह्यात दरड कोसळल्याने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी महामार्ग बंद ठेवावा लागल्याने शेकडो वाहने अडकून पडली.

जम्मू विभागातील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांना दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्याशी जोडणारा मुगल रस्ताही भूस्खलनामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महामार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या पीरा पुलाचा काही भाग मुसळधार पावसामुळे वाहून गेला. उधमपूर शहरापासून सुमारे १६ किलोमीटरवरील टोल्डी नाल्याजवळ जम्मू-श्रीनगर महामार्गाचा १५० फूट भाग वाहून गेला. तावी नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

एका वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद ठप्प झाला आहे. रामबन जिल्ह्यात एक घर कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रियासी जिल्ह्यातील अनस नदीत पाच जण पुरात अडकले होते, त्यांची पोलिसांनी सुटका केली. दोडा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अनेक डोंगराळ भागात धोक्याचा इशारा दिला आहे. झेलम नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असलेल्या भागातही पूर आला आहे. श्रीनगरमध्ये मंगळवार हा जूनमधील ५० वर्षांतील सर्वात थंड दिवस ठरल्याची माहितीही एका अधिकाऱ्याने दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले, की चिनाब नदी आणि तिच्या उपनद्या आणि रामबन आणि दोडा जिल्ह्यांतील उताराच्या आणि निसरडय़ा भागात धोक्याचा इशारा दिला आहे. रामबन-उधमपूर विभागात मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर तीसहून अधिक ठिकाणी भूस्खलन झाले, त्यामुळे बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी २७० किलोमीटरचा महामार्ग बंद राहिला.