कोट्टयम/इडुक्की : मध्य केरळातील दोन जिल्ह्य़ांच्या पर्वतीय भागांमध्ये मुसळधार पाऊस व भूस्खलन यामुळे मृत्यू ओढवलेल्यांचे आणखी मृतदेह बचाव पथकांनी रविवारी ढिगाऱ्यांतून काढल्यानंतर मृतांची संख्या १८ वर पोहोचली.बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी आणखी १५ मृतदेह ढिगारे आणि इडुक्की व कोट्टयम जिल्ह्य़ांत शनिवारी कोसळलेल्या दरडींच्या चिखलातून बाहेर काढले असल्याचे राज्याचे महसूलमंत्री के. राजन यांनी सांगितले.

भूस्खलनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इडुक्की जिल्ह्य़ातील कोक्कयार येथून रविवारी आणखी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, बेपत्ता असलेल्या पाच जणांचा शोध सुरू आहे, असे इडुक्कीच्या जिल्हाधिकारी शीबा जॉर्ज यांनी सांगितले.

चिखलाखाली गाडल्या गेलेल्या तीन मुलांचे मृतदेह कठोर परिश्रमानंतर हाती लागले. ८, ७ व ४ वर्षे वयाची ही मुले एकमेकांना धरून होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रभावित भागांमध्ये बचावकार्य वेळेत सुरू करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले, असा आरोप कोक्कायार व कूट्टिक्कल येथे भेट दिलेले राज्याचे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी केला.

कोट्टयम जिल्ह्य़ातील कूट्टिक्कल येथील एक घर भूस्खलनात वाहून गेल्यामुळे ४० वर्षांचा एक इसम, त्याची ७५ वर्षांची आई, ३५ वर्षांची पत्नी तसेच १४, १२ व १० वर्षांच्या तीन मुली असे सहा जणांचे कुटुंब मृत्युमुखी पडले. यापैकी तिघांचे मृतदेह काल, तर उरलेल्या तिघांचे आज सापडले. दरम्यान, शनिवारी राज्यात थैमान घातलेल्या पावसाचे प्रमाण रविवारी कमी झाले होते.

पंतप्रधानांची विजयन यांच्याशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि राज्यात मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. या नैसर्गिक संकटात काही जणांचे बळी गेल्याबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांबाबत संवेदना व्यक्त केल्या.

गृहमंत्री शहा यांचे मदतीचे आश्वासन मुसळधार पाऊस व भूस्खलनाचा फटका बसलेल्या केरळच्या लोकांना केंद्र सरकार शक्य ती सर्व मदत करेल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे. सरकार या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत असून, बचावकार्यात मदतीसाठी एनडीआरएफची पथके यापूर्वीच रवाना करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.